पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भालेराव जीप घेऊन कलेक्टरांकडे गेले व शिंदे घरी परतले. "किती उशीर हा कान्त? भूक लागली असेल ना? मी अन्न गरम करते...."
 “नको रेणू, मला जरा पडू दे शांतपणे, मग पाहीन जेवणाचं. डोकं सुन्न झालं आहे..!"
 शांतपणे रेणू त्यांच्याजवळ आली व त्यांना तिनं पलंगावर झोपवलं व बाम घेऊन त्यांचे कपाळ आपल्या नाजूक - गोव्यापान हातांनी हळुवारपणे चोळू लागली.
 तिचं निकट सान्निध्य व तिचा हळुवार स्पर्श मात्र आज त्यांच्या क्षुब्ध मनाला सांत्वना देण्यास असमर्थ होता. तिचा गोरापान हात पाहाताना न पाहिलेल्या ठकूबाईचा वाळलेला, कष्टानं रापलेला हात त्यांच्या नजरेसमोर येत होता.

 ....आणि जागच्या जागी अस्वस्थपणे ते क्षणाक्षणाला कूस बदलत होते, रेणूचा हात आपल्या कपाळावर घट्ट दाबून धरीत होते.. तरीही ते शांत होत नव्हते. त्यांचा क्षोभ कमी होत नव्हता....!

लक्षदीप । ८३