पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुन्हा एकदा तीच हताशता शिंद्यांना जाणवली. शर्मानी रेकॉर्ड नीट ठेवलं असणार यात काहीच शंका नव्हती. पुन्हा त्यांना सरपंचाची साथ होती, त्यामुळे तपासात दुकान बंद होतं हे निष्पन्न होणं रेकॉर्डवर तरी शक्य नव्हतं.
 त्याचे दुकान सस्पेंड केलं तरी काही दिवसांनी तो सहीसलामत खात्रीपूर्वक सुटला असता....!
 “आणि हुजूर, बोरसरचं दुकान नुकतंच आपण सस्पेंड केलंय. ते काळगाव दिघीला म्हणजे माझ्या दुकानाला जोडलंय. ते पत्र परवा तलाठ्यानं आणून दिलंय मुनिमाकडे - पत्राच्या ओ. सी. वर त्यांची सही व तारीख आणि तलाठी अप्पाचा तामिली रिपोर्ट पहा - त्याप्रमाणे काल त्यांनी चलनानं पैसे भरले व आज गोडाऊनकडे मेटॅडोर पाठवलाय साहेब धान्य आणण्यासाठी....!"
 शर्माच्या राज्यात सारं काही आलबेल होतं, हाच याचा मथितार्थ होता. शिंद्यांना काही बोलणं शक्य नव्हतं.
 ते सारे गेल्यानंतर भालेराव म्हणाले, “सर, मी वयाच्या वडिलकीनं सांगतो. आपण एवढा त्रास करून घेऊ नका जिवाला. तुमचा काहीएक दोष नाही. प्रत्येक कार्यकारी यंत्रणेचे काही नियम असतात, त्याप्रमाणे ते काम करतात. रांजणीला कुटुंब राहिलं असतं तर हा प्रकार घडलाही नसता, पण शेतक-यांनी अडविल्यावर जबरदस्तीनं कामही करता येत नाही. पाटील साहेबांविरुद्ध रिपोर्ट करता येईल. पण त्याच्या खातेनिहाय चौकशीत ते जरूर सुटतील!”
 “भालेराव, ते सारं खरं, पण ठकूबाई उपासमारीनं मेली हे सत्य काही नाकारता येणार नाही. आय फील गिल्टी - मला विलक्षण शरमिंदं वाटतं....!”
 “आपण नुकतेच या खात्यात आला आहात सर! हा पहिलाच क्रायसिसचा प्रसंग आहे, पण इथं टफ झालंच पाहिजे. आणखी एक सांगतो, माझ्या पुढे म्हणालात, पण चुकूनही यानंतर कुणापुढे ठकूबाईचा भूकबळी झाला असं म्हणून नका. - ती अतिश्रम, आजारानं मेली, असाच आपण रिपोर्ट द्यायचा, मी तो तयार करतो व तो सारे जण मान्य करतील. कोणीही आक्षेप घेणार नाही, याची मी गॅरंटी देतो...!”
 भालेरावांनी तयार केलेला अहवाल वाचताना शिंद्यांचं मन त्यांना सांगत होतं. हे पांढ-यावर केलेलं काळं आहे, हा शब्दांचा खेळ आहे. रंगसफेदी आहे. - खरं एकच आहे. ठकूबाईचा भूकबळी पडला आहे...!' पण मन आवरीत त्यांनी त्या रिपोर्टवर स्वाक्षरी केली.

 “सर, मी स्वतः हा अहवाल घेऊन कलेक्टर साहेबांकडे जातो व त्यांना सविस्तर माहिती देतो, तुम्ही रेस्ट घ्या. तुमच्या मनावर बराच ताण पडलेला आहे...!”

८२