पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतं.
 त्यांनी राघुकडे निरखून पाहिलं - मध्यम वय, अंगावर मळकट धोतर व सदरा. दाढी वाढलेली, रापलेला काळाकभिन्न चेहरा, त्यावर सुन्नतेचा लेप...!!
 “राघू.. काय झालं बाबा? मी तर तुला व तुझ्या घरच्यांना रांजणीच्या कामावर पाठवलं होतं ना?"
 “तेचं आसं काय सायेब....' अडखळत राघू सांगू लागला....
 राघू ननावरे गाडीलोहार या भटक्या जमातीत मोडणारा. पण जहागीरदार किशनदेव रायांनी निजामाच्या आमदानीत त्याच्या आजोबाला बैलगाडी बनवण्याच्या कसबावर खूश होऊन काळगाव दिघी परिसरातील पाच एकर जमीन दिलेली. आज वाटण्या होऊन राघूच्या वाट्याला जेमतेम दीड एकर आलेली.
 मुळात तालुकाच डोंगराळ, म्हणून कठीण, खडकाळ जमीन. तिथे नैसर्गिक पाण्यावर बाजरीखेरीज काही पिकायचं नाही. बाजरीचं पीकही दुष्काळात पुरेसं येत नाही. यावर्षीही असंच झालं. पावसाळा लांबला. मृग पूर्ण कोरडा गेला, त्यानंतर दोन जेमतेम पाऊस झाले. त्यावर कशीतरी तीन क्विंटल बाजरी पदरात आली. त्यातली एका बाजारात दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे पडत्या भावात ताबडतोबीने विकून आलेल्या पैशात किरकोळ उधार-उसनं देणं व मीठ-मिरचीची तरतूद करणं भाग होतं. उरलेले धान्य राघू, त्याची बायको व दोन मुले आणि विधवा होऊन त्याच्याकडेच राहायला आलेली बहीण ठकूबाई एवढ्या प्रपंचाला कितीसं पुरणार? दिवाळीला तर त्यातला एक कणही राहिला नव्हता.
 दरवर्षी शेजारच्या रामपूर तालुक्यात तो सर्व कुटुंबकबिल्यासह साखर कारखान्यावर ऊसतोडीला जायचा. यंदा ऊसही पावसाअभावी कमी झालेला, म्हणून फेब्रुवारीतच गळित हंगाम संपला. ठेकेदाराकडून परततानाच पुढील वर्षाची आगाऊ रक्कम घेतली, तीही हां हां म्हणता संपून गेली आणि त्या कुटुंबाला आता रोजगार हमीच्या कामाखेरीज जगण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता.
 राघूनं कामासाठी शोधाशोध सुरू केली. तेव्हा सुदैवानं शेजारच्या गावात तांड्याला जोडणाच्या जोडरस्त्याचं काम नुकतंच सुरू झालं होतं. या कामावर आवश्यकता असूनही जास्त मजूर मिळत नव्हते. कारण डोंगराळ भाग असल्यामुळे जवळपास माती नव्हती. खडक होता. तो फोडणं अवघड काम होतं.
 याचा प्रत्यय राघूला व त्याच्या पत्नीला - बहिणीला आला. पहिल्याच दिवशी खडी फोडून हाताला फोड आले होते. पण इतर कामापेक्षा मजुरीचे दर जादा होते व आसपास दुसरे कोणतेही कामे सुरू नव्हते, म्हणून शरीर साथ देत नसतानाही त्यांना कामावर जाणे भाग होते.

 घरधनी गेल्यानंतर पांढरं कपाळ घेऊन भावाकडे आल्यानंतर त्याच्यावर कमीत

७४ । लक्षदीप