पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शकत होते. तरीही झालेलं फार कमी आहे व करायचं तर एवढं प्रचंड आहे की छाती दडपून जावी, या विचारानं ते बेचैनही व्हायचे.
 मागेपुढे कधी सवड मिळाली तर ‘दुष्काळाचे अर्थशास्त्र व व्यावहारिक उपाययोजना अशा त-हेचा विषय पीएच. डी. साठी घ्यायचा व अधिक खोलात जाऊन त्याचा अभ्यास करायचा, असं त्यांनी मनोमन ठरवूनही टाकलं होतं.
 शिंद्यांची विचारधारा थांबली ती भालेरावच्या येण्यामुळे, तहसीलदारांच्या चेंबरमध्ये येण्यापूर्वी ते आपल्या कार्यालयात गेले होते, तेव्हा कलेक्टर कचेरीचा वायरलेस नुकताच आला होता व तो वाचून आपल्याला कशासाठी तातडीने बोलावलंय याचा भालेरावांना अंदाज आला होता.
 “भालेराव, मघाशी कलेक्टर साहेबांचा फोन होता. काळगाव दिघीची एक महिला रोजगार हमीचं काम न मिळाल्यामुळे मरण पावली...."
 “आताच त्यासंबंधी वायरलेस आला आहे सर! भालेराव म्हणाले, “मी काम मागितलेल्या व्यक्तींची नावे असलेले रजिस्टर सोबत आणले आहे. त्यांनी रजिस्टर उघडीत एक एक पान उलटायला सुरुवात केली.
 शिंदे अस्वस्थपणे पेपरवेटशी चाळा करीत होते. काही वेळानं भालेराव म्हणाले, सर, मागील आठवड्यात काळगाव दिघीच्या एका कुटुंबानं लेखी अर्ज करून कामाची मागणी केली होती. त्यांची नावे आहेत राघू ननावरे, त्याची पत्नी पारू व बहीण ठकूबाई - आणि वायरलेसमध्ये भूकबळी म्हणून ठकूबाईचं नाव आहे...!"
 आता शिंद्यांना थोडासा उलगडा झाला होता. त्यांच्याकडे राघूनं "शेतकरी व शेतमजूर पंचायती” मार्फत कामाच्या मागणीसाठी लेखी अर्ज दिला होता, पण काळगाव दिघी पॉकेट मध्ये, ज्यात चार ग्रामपंचायतींचा समावेश होता, एकही काम चालू नव्हते. एक पाझर तलाव मंजूर होता, त्याच्या एका भरावाचं कामही मागच्या वर्षी पूर्ण झालं होतं. त्याचा दुसरा भराव शेतक-यांनी अडवला होता व भूसंपादनाची कार्यवाही अपूर्ण होती. शेतक-यांना किमान ऐंशी टक्के मोबदला, अॅडव्हान्स हवा होता. त्यासाठी स्वत: शिंदे प्रयत्नशील होते. पण शासनाकडून पतमर्यादा न आल्यामुळे तो देता येत नव्हता व त्यामुळेच हे पाझर तलावचे काम बंद पडले होते.
 म्हणून त्यांनी सहा किलोमीटर अंतरावर नाला बंडिंगचे एक काम चालू होते, तिथे राघू व त्याच्या कुटुंबीयांनी जावे असे लेखी आदेश दिले व त्याची एक प्रत शिपायामार्फत बंडिंगचे अधिकारी चव्हाण यांनाही पाठवली.
 आज राघूची बहीण ठकूबाईचा भूकबळी पडला होता. कागदावर शिंद्यांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. तरीही कुठेतरी काहीतरी चुकतेय, ही त्यांची टोचणी कमी होत नव्हती.

 “राम राम रावसाहेब...."

७२ । लक्षदीप