पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला नाही त्यामुळे ते तेथे रमले नाहीत.दरम्यान स्टेट बँक रिक्रूटमेंटद्वारे त्यांना नोकरी मिळाली.मात्र त्यांच्या मनात आयएएस अधिका-यांचे स्वप्न होते.बँकेत असताना स्पर्धापरीक्षेचा ते अभ्यास करू लागले व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना यश मिळाले.१९८३ मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वप्रथम आले लवकरच ते प्रशासन सेवेत दाखल झाले.आणि १९९६ साली त्यांना आय.ए.एस.चा दर्जा मिळाला.प्रशिक्षण कालावधीसाठी त्यांचे पोस्टिंग दहीवडी (जि. सातारा) येथे झाले.या प्रशिक्षण कालावधीत त्यांना व्ही.पी.राजा नावाचे आय.एस. अधिकारी लाभले.राजा यांच्या कार्यशैलीचा व श्रेष्ठ अशा उच्चतर नैतिक गुणांचा प्रभाव पडला,याचा ते वारंवार कृतज्ञतेने उल्लेख करतात.साधारणत: या काळातील सामाजिक अवकाश,देशमुख यांच्या घरातील वातावरण,संस्कार व वाचन याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या लेखनावर आहे.
 त्यानंतर त्यांची भूम (जि. उस्मानाबाद) येथे प्रांत म्हणून बदली झाली.भूम हे तसे आडवळणाचे दुष्काळी गाव.भूममध्ये त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली.त्यानंतर त्यांनी अकोला,नांदेड,परभणी,सांगली,पुणे व कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी,निवासी जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी म्हणून काम केले.सप्टेंबर २०१४ साली मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचे कार्यकारी संचालक म्हणून ते निवृत्त झाले.त्यांच्या प्रशासकीय कामाचा तपशील मुद्दाम दिला आहे.याचे कारण देशमुख यांच्या लेखनाचे विषय या प्रदेशांनी व तिथल्या अनुभवांनी पुरविलेले आहेत.परभणी,कोल्हापूर गावामध्ये त्यांच्या अनेक साहित्यकृतींची निर्मिती झालेली आहे.दीर्घकाळ त्यांनी ज्या प्रशासकीय व्यवस्थेत काम केले तेथील अनुभवाधारित चित्रणविषय आलेले आहेत.प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामांची आखणी करून त्याची परिपूर्ती केली.विविध ठिकाणच्या त्यांच्या कार्यकाळात सेव्ह द बेबी गर्ल,स्वस्त धान्य दुकानांचा काळाबाजार रोखण्यासाठी सुरू केलेली एम. डिस्ट्रीब्युशन व व्हीटीएस सेवा,औढ साक्षरता अभियान प्रकल्प,ई-चावडी,अकोल्यातील बालमजुरांसाठीचा नवजीवन प्रकल्प व पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील अद्ययावत संकुल ही त्यांची काही लक्षणीय प्रशासकीय स्वरूपाची कामे होत.त्यांच्या लेखनाचे मुख्य केंद्र या जीवनातून उद्भवलेले आहे.एक सकारात्मक रचनात्मक दृष्टिकोनातून प्रशासन व्यवस्थेकडे पाहणारा अधिकारी आणि व्यक्तिमत्त्वातील संस्कार या दुहेरी गोफातून त्यांचे वाङ्मयविश्व अवतरलेले आहे.या विविध तन्हेच्या अनुभवांचा उपयोग त्यांनी लेखनासाठी केला.प्रशासकीय जीवनातील विविध रंगचित्रे त्याच्या भल्याबुच्यासह ललित साहित्यातून मांडली.

 मराठवाडा हा त्यांच्या घडणीचा व प्रशासकीय सेवेचा दीर्घकाळ कालावधी राहिला.या परिसराशी ते आंतरिकरीत्या जोडले गेलेले आहेत.या प्रदेशाने व तिथल्या

६ । लक्षदीप