पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 खटकन् आवाज झाला, “हॅलो, चंद्रकांत?"
 गुडमॉर्निग सर!” शिंद्यांनी आवाजात आदब आणीत अभिवादन केलं.
 "व्हॉट इज गुड इन धिस मॉर्निग, चंद्रकांत?"
 कलेक्टरांचा रोखठोक स्वर कानी पडताच ते चमकले, सावध झाले. काहीतरी अघटित घडलंय, जे तहसीलदार असून आपल्याला माहिती नसावं किंवा आपण रिपोर्ट न केल्यामुळे इतर मार्गांनी त्यांना काहीतरी समजलं असावं. अन्यथा ते तसे शांत व खेळकर आहेत. पण आजचा नूर काही वेगळा दिसतोय. शिंद्याच्या मनाला एक अल्पशी भीतीची लहर स्पन गेली.
 “पार्डन सर - माझं काही चुकलं का?" कलेक्टरांना काय म्हणायचं होतं हे माहीत नसले तरी नोकरशाहीच्या शिरस्त्याप्रमाणे वरिष्ठापुढे आपली असलेली - नसलेली चूक कबूल करत शिंदे हळुवारपणे आवाजात नसलेली नम्रता आणीत म्हणाले.
 “आजचा ‘मराठवाडा' वाचला आहे?"
 “नाही सर, तो इथं दुपारी येतो चार नंतर-" शिंद्यांनी खुलासा केला, “काही विशेष सर?"
 “भयंकर आहे - तुमच्या तालुक्यात भूकबळी पडल्याची बातमी आहे - समजलं?”

 आता कुठे कलेक्टरांच्या तीक्ष्ण स्वराचे मर्म शिंद्यांच्या लक्षात आलं होतं. महसूल खात्यात जरी ते नवीनच थेट तहसीलदार म्हणून लागले असले तरी खाण्यासाठी भूकबळी पडणं ही किती नामुष्कीची गोष्ट आहे हे ते जाणून होते. या वर्षी पूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी अवर्षण परिस्थिती होती, तर त्यांच्या तालुक्यात शासनानं मागच्याच आठवड्यात दुष्काळ जाहीर केला होता. रोजगार हमीची कामे फार मोठ्या प्रमाणावर सुरू होती, त्याच्या संदर्भात मजुरी - भ्रष्टाचाराच्या तक्रारी, धान्य कुपनावर धान्य न मिळणे किंवा जादा भाव लावणे इत्यादी तक्रारीही त्या प्रमाणात वाढल्या होत्या. याखेरीज दररोज कुठल्या ना कुठल्या गावातून नवीन कामाची मागणी येत होती. पुन्हा त्यांच्या तालुक्यात शेतकरी शेतमजूर पंचायत प्रभावी होती. त्यांच्यामार्फत लेखी फॉर्म भरून कामाची मागणी व्हायची. अशा वेळी कायद्याप्रमाणे त्यांना त्वरित रोजगार हमीचे काम देणे भाग पडायचे. अन्यथा बेकार भत्ता देणे बंधनकारक होते व ते 'मागेल त्याला काम देणाच्या राज्यशासनासाठी नामुष्कीची बाब होती. त्यामुळे शिंद्यांना फार दक्ष राहावं लागत होतं, पण रोजगार हमीचं प्रत्यक्ष काम करणारी मृदसंधारण, बांधकाम वा सिंचन विभागाची यंत्रणा मात्र तेवढी जागृत नव्हती, त्यांना दुष्काळाचे म्हणावे तेवढे भान नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य शिंद्यांना मिळत नव्हतं. समन्वयक म्हणून त्यांना प्रसंगी स्वत:ची तहसीलदारकी विसरून थेट

लक्षदीप । ६९