पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "कुठे गेला होता धनी रातच्याला, सांगून पण गेला नाहीत सासूबाईस्नी?...."
 "वेडी का खुळी तू गजरा?" खदाखदा हसत हणमंता म्हणाला, “शेवंताबायकडे जाताना का आईला सांगून जायचं असतं?"
 "धनी, हे मी काय ऐकतेय?"
 "खूप मजा आली. काय मस्त आहे शेवंताबाय! साली काय गच्च भरली आहे....' आणि बीभत्स हातवारे करीत तो सांगू लागला.
 "शी.... शी...! इथे मी तुमची लग्नाची बायकू जिती हाय... तरी तुम्हीं बाजार हुडकता?' तिचा संताप आवरत नव्हता.
 ‘तुझ्यासंगं मजा नाही येत... हाडंडाडं लागतात. छे! बाई कशी हवी!”
 संताप व कमालीच्या उद्वेगानं गजरा भणाणून गेली होती. काल दिवसभर मनात जे ठसठसत होतं, ते एवढं खरं व्हावं याची तिला खंतही वाटत होती...
 यावर्षी निसर्ग मेहरबान होता. पाऊसपाणी वक्तशीर व वेळेवर झाला. पुन्हा एकदा हणमंताच्या शेतात ऊस व गहू बहरून आले....
 पाझर तलावाचं काम संपलं होतं. पाऊस ओसरताच गावातच पुन्हा जमीन सपाटीकरणाचे काम निघालं. ग्रामपंचायतीनं दवंडी दिली आणि गजरा पण कामावर जायला निघाली. “गजरे, आता कशाला जातेस कामावर? आवंदा शेतं झकास पिकली आहेत. आता काय कमी आहे आपल्याला? । “जरा स्पष्ट बोलू का? राग नाही ना धरणार धनी?” गजरा धीटपणे म्हणाली, कमी आहे ती माझ्यामध्ये... मी सुकलेय, नुसती हाडहाडं लागतात ना.....!”
 “होय गजरे, पूर्वी तू किती छान दिसायचीस.... या रोजगार हमीच्या कामानं पार रया गेली बघ तुझी."
 “म्हणूनच तुमचं बाजारबसवीकडे जाणं सुरू झालं! गजरा धीटपणे म्हणाली, मला हौस नव्हती कामावर जाण्याची. पण पोटाला फासे पडल्यावर कुणीतरी कमावून आणलं पाहिजेच की!”
 "पर ते जाऊ दे, आता सारं ठीक झालंय ना?”
 "नाही धनी, ठीक झालं असेल ते तुमच्यासाठी. या गजरेसाठी नाही.”
 तुला म्हणायचं तरी काय आहे?....”
 "ही गजरा नकोच होती तुम्हाला कधी... पाहिजे होतं ते तिचं शरीर! ते हाडकलं आणि तुम्ही बाजार जवळ केला!” गजराचा आवाज कापत होता, “धनी, आज बाजार जवळ केला.... उद्या घरी सवत पण आणाल. परवा मला घराबाहेर पण काढाल....."
 “छे, छे! असं कसं होईल?"
६६ । लक्षदीप