पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळेल, हे सुकलेलं शरीर पुन्हा भरून येईल. पुन्हा आपण हणमंताच्या प्रेमाला पात्र होऊ...
 “आईऽगं..." गजराला जोरदार ठेच लागली होती. आपल्या विचाराच्या नादात चालताना तिला भानं राहिलं नव्हतं. कळवळून ती काही क्षण खाली बसली. रक्ताळलेला अंगठा तिनं दाबून धरला, कळ ओसरताच पुन्हा ती उठून चालू लागली....
 पण आपण पूर्वीप्रमाणे हणमंताशी समरस होऊ...?
 गजरा या प्रश्नासराशी पुन्हा अडखळली... आताची ठेच ही मनाला होती, तरी चालण्याच्या गतीमध्ये खंड पडला नव्हता.
 हे तर सरळ बाजारबसवीप्रमाणे झालं! किंमत आहे ती केवळ मांसल देहाला... या मनाला काही मोल नाही?
 वाडा दिसू लागताच मनातले भरकटलेले विचार मागे पडले आणि समोर खेळत असलेला व्यंकू तिला पाहाताच पळत येऊन चिकटला. तिनंही त्याचा मायेनं मुका घेतला!
 अंमळसा विसावा घेऊन गजरा पुन्हा घरच्या कामाला लागली. चूल पेटवून चपात्या भाजू लागली. व्यंकू समोर ताट घेऊन बसला होता. सासूला पण तिनं वाढून दिलं होतं!
 हणमंता घरी नव्हता. सासूलाही बाहेर जाताना सांगून गेला नव्हता. त्या रात्री तो घरी आलाच नाही. त्यामुळे गजरालाही पोटात भुकेचा आगडोंब उसळूनही उपाशी निजावं लागलं.... दिवसभराच्या कामानं शरीर मोडून आलं होतं. आदल्या रात्रीच्या जाग्रणानं आधीच डोळे चुरचुरत होते... परत आजही किती वेळ तरी झोप आली नाही. केव्हातरी पहाटे तिचा डोळा लागला.
 आणखी एक नवा दिवस.. पण आज बाजाराचा दिवस म्हणून कामाला सुट्टी होती. तरी दुपारी बाजाराला जायचं होतं.. प्रपंचाच्या वस्तू खरेदीलो. पण रात्रभर हणमंता न आल्यामुळे गजराचं कशातच मन लागत नव्हतं!
 कुठे गेला असेल बरं हणमंता?... हा प्रश्न तिला सतत सतावत होता. जारच्या नामदेवानं सर्वत्र पाहिलं, पण पत्ता लागला नाही. एवढं मात्र समजलं होतं की, ती साखर कारखान्याच्या गावी जाऊन दुपारी परतला होता व संध्याकाळी परत बाहेर पडला होता.

 चहा झाल्यावर ती वेणीफणीला बसली, तोच आवाज आला. म्हणून तिनं Sोकावून पाहिलं... दारात हणमंता उभा होता. त्याला स्वत:चा तोल सावरत नव्हता. डाळ ताबरलेले... कपडे विस्कटलेले... गजराच्या अंगावर भीतीचा काटा सरसरून आला. ती पुढे झाली आणि तिच्या नाकात एक घाणेरडा दर्प शिरला... हा दारू पिऊन आला आहे खचितच.

लक्षदीय ॥ ६५