पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

|| प्रस्तावना

 लक्षदीप हा लक्ष्मीकांत देशमुख यांच्या निवडक साहित्याचा संपादित संग्रह.देशमुख यांनी १९८० नंतर विविधस्वरूपी लेखन केलेले आहे.सनदी अधिकारी म्हणून ते नुकतेच निवृत्त झाले आहेत.कथा, कादंबरी,ललित व वैचारिक असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप आहे.देशमुख यांनी लिहिलेल्या विविध प्रकारातील प्रातिनिधिक स्वरूपात लेखनाचा समावेश या संपादनात केला आहे.कथा,नाटक,ललित व प्रवासवर्णन व वैचारिक लेखांचा अंतर्भाव या संपादनात आहे.कादंबरीचा अंश देण्यामुळे तिची एकात्मता नाहीशी होईल म्हणून कादंबरी संहिता दिलेली नाही.त्यामुळे या संपादनात कादंबरीलेखनाचा समावेश पृष्ठसंख्येमुळे केलेला नाही.मात्र प्रस्तावनेत त्यांच्या कादंबरीलेखनाचे वेगळेपण नोंदविले आहे.

 एक लेखक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांच्या घडणीमागे विविध ठिकाणचे प्रदेश व अनुभवक्षेत्र साहाय्यभूत ठरले आहेत.तसेच त्या घडणीच्या मागे असणा-या कालधर्माचाही संबंध आहे.साधारणतः स्वातंत्र्यानंतरच्या तीनेक दशकाच्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व लेखकपणाची घडण झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर समूहजीवनात आलेली नवी स्वप्नकांक्षा,या स्वप्नकांक्षेला सांस्कृतिक जगाने दिलेला प्रतिसाद त्या काळात देशमुख घडत होते.तसेच १९६० नंतरच्या मराठी साहित्यविश्वात अनुभवविश्वाचे काही उद्रेक घडत होते.त्याचेही सादपडसाद या काळातील व्यक्तींवर-लेखकांवर घडणे स्वाभाविक होते.मुरुम (जि. उस्मानाबाद) हे लक्ष्मीकांत देशमुख यांचे जन्मगाव,वडील शिक्षक होते.त्यांच्या विविध ठिकाणी बदल्यांमुळे त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या गावी घडले.निजामी राजवटीच्या खाणाखुणा असणा-या प्रदेशाचे संस्कार त्यांच्यावर झाले.वाचनाचा पहिला संस्कार त्यांना त्यांच्या आईकडून झाला.उस्मानाबाद,नांदेड येथे त्यांचे शिक्षण झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र विषयात एम.एसस्सी. पदवी मिळवली.संशोधनाची आवड असल्यामुळे त्यांनी पीएच.डी.साठी नाव नोंदविले.मात्र विद्यापीठीय संशोधनाचा काच त्यांना सहन

लक्षदीप । ५