पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४. बांधा



 ता आता लख्ख जागी आहे, पण उठायला मन होत नाहीय. डोळे चुरचुरताहेत... काल रात्री झोप अशी लागलीच नाही. ती ग्लानी होती. डोळे जडावून विसावले होते एवढंच.
 अंग कसं जडशीळ झालं... मनाप्रमाणे साच्या शरीरातही एक अनिच्छा, एक विमनस्कती भरून आहे...
 गजरानं मोठ्या प्रयासानं जडावलेले दुखरे डोळे उघडले. चांगलं फटफटून आलं होतं! आता उठायला हवं.. घरचं सारं व्हायचं आहे...
 आणि ते करून रोजगार हमीच्या कामावर जायचं आहे...
 शरीराला ओळोखेपिळोखे देत गजरा उठणार तोच हणमंताचा तिच्या शरीराभोवती हात पडला आणि झोपेतच त्यानं तिला कुशीत ओढलं... तीही तेवढ्यात सहजतेनं त्याच्या मिठीत शिरली...
 खरं तर काल रात्रीचा रंग कसा तो चढलाच नव्हता. तो असमाधानी, ती बेचैन. तारा न जुळलेल्या त्या खोलीत रात्रभर ती एक ठसकी वेदना घेऊन तळमळत होती, तो मात्र कूस बदलून बिनघोर झोपी गेला होता.
 एक अनाम बेचैनी गजराला स्पन गेली आणि झटक्यात तिनं तिच्याभोवती पडलेला हणमंताचा कणखर हात बाजूस सारला... आणि उठून ती खिडकीजवळ गेली. खिडकी उघडताच पहाटेचा थंड वारा तिच्या उतरलेल्या व ताठरलेल्या चेह-याला स्पर्श करून गेला. त्या ताजेपणानं ती सुखावली...
 परसदारी जर्सी गाय संथपणे रवंथ करीत होती. तिच्या पुढ्यात मागल्याच आठवड्यात तगाई म्हणून मिळालेला वनखात्याचा चिपाड झालेला शुष्क चारा होता. पहिले दोन दिवस तर गाईनं त्याला तोंडही लावलं नाही. पण भुकेपोटी आता तिनं तोही गोड मानला होता.... संथपणे ती त्या वाळक्या चा-याचं रवंथ करीत उभी होती!

 किती वाळली होती ही गाय! दोन वर्षापूर्वी ती चव्हाणाच्या गोठ्याची शान होती. दररोज पाच ते सहा लिटर दूध देणारी; पण दुष्काळाच्या अस्मानी संकटानं तिची पार

५८ ॥ लक्षदीप