पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चित्रं येत होती.
 सकाळी मी सहाच्या ठोक्याला उठलो तो एक निश्चय मनोमन करून, ‘सराकडे आपण जयाची मागणी करायची.'<br  माझ्या मनात का तिची अनुकंपा होती? का कॉलेजवयीन आकर्षण - जे कालौघात आजही कायम होतं? मला आजही - मी मानसशास्त्रज्ञ असूनही नीटसा उलगडा होत नाही. कदाचित दोन्ही भावना अर्धस्फुट असाव्यात...
 सरांना मी तेव्हा म्हणालो होतो.
 "सर, मी अनुकंपेपोटी मागणी घालतोय असे समजू नका. मी आपला विद्यार्थी आहे आणि पुरेसा रॅशनल आहे. साखरपुडा झाल्यानंतर मकरंदचा मृत्यू ही अशी एक घटना आहे ज्यात जयाचा यत्किंचितही दोष नाही. आणि कॉलेजमध्ये असल्यापासून तिच्यावद्दल सुप्त प्रेम होतं - आजवर मी त्याचा उच्चार करायचं धाडस केलं नाही.आता तुम्ही व जयानं ठरवायचं - मी तुम्हाला योग्य वाटतो का?"
 मी त्यांचा आवडता विद्यार्थी असल्यामुळे सरांची मला खात्री होती. प्रश्न खरा होता तो जयाचा! सर औरंगाबादला परतल्यानंतर आठ-एक दिवसांनी जयाचे पत्र आले.
 ‘प्रिय नरेश,
 पपांनी मला सर्व काही सांगितले. माझी संमती आहे. पण एक गोष्ट मी आत्ताच स्पष्ट करू इच्छिते. मकरंदशी माझा साखरपुडा झाल्यावर आम्ही दोन-चार वेळा हिंडलो-फिरलो होतो... अर्थात लक्ष्मणरेषा सांभाळूनच. तरीही माझ्या मनात काही काळ का होईना पती - सहचर म्हणून त्याची प्रतिमा ठसली होती हे खरं...
 “मी त्याला विसरायचा प्रयत्न करीत आहे. जखमेवर नक्कीच खपली धरला गेली आहे. कालौघात मी त्याला विसरून जाईन - मला काही काळ तरी व्रण हा राहाणारच, हे मी तुला सांगावं असे नाही. तू मानसशास्त्रज्ञ आहेस. माणसाचं मन केवढं कॉम्प्लेक्स आहे हे तू जाणतोसच. मला तू नीट समजून घेशील ही आशा मी करू का?"
 त्या छोट्याशा पत्रानं माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठला होता. त्यात किता परस्पराविरोधी भावछटा होत्या, हे मी माणसाच्या मनाचा अभ्यास करणारा असूनही पुरेसं जाणू शकलो नाही.
 मनात कुठेतरी दुय्यमत्वाची नांगी डंख मारीत होती.
 जया, तू एवढी नितळ, पारदर्शी आणि प्रामाणिक कशी? हे सारं मला ठाऊक होतं तरीही स्पष्टपणे तू ते प्रकट केलंस. सरांची कन्या शोभतेस खरी...

 माझ्यावर फार मोठी जिम्मेदारी टाकलीस तू... तुला समजून घेणे - या अशा विचित्र परिस्थितीत... तुझ्या भावविश्वात सहचरावर पहिला ठसा मकरंदचा उमटलेला

५४ ॥ लक्षदीप