पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेव्हा त्यांनी अनिच्छेनं सांगितले. त्यांच्या सांगण्यानं मला धक्काच बसला.
 जयाचा मकरंदशी साखरपुडा झाला होता. सरांची एकुलती एक कन्या म्हणून त्यांनी मोठ्या उत्साहात हा समारंभ केला आणि लग्नतिथी ठरली असता व लग्नाची तयारी सुरू असता मकरंद स्कूटरवरून जाताना त्याला एक भरधाव वेगानं जाणाच्या मालट्रकनं उडवलं आणि एक तरुण जीवाची त्यात इतिश्री झाली!
 सर या आघातानं भयंकर खचले होते. जयाची अवस्था मी न पाहता कल्पनेनं जाणू शकत होतो.
 एकदा विषयाला तोंड फुटल्यानंतर सर बांध फुटल्याप्रमाणे आवेगानं बोलत राहिले आणि मी भावविभोर होत ऐकत राहिलो.
 मकरंद देखणा होता, सरांना तो बेहद्द आवडला होता जावई म्हणून. बजाज ऑटोमध्ये उच्चपदस्थ तंत्रज्ञ होता. चार आकडी पगार होता. पवईच्या आय. आय. टी. संस्थेत इतकी वर्षे शिक्षणासाठी राहिला होता, तरीही शालीन व सुसंस्कारित होता.
 आता मला जया पण आठवत होती. मी तेव्हा औरंगाबादला एम. ए. करीत होतो. तेव्हा सरांकडे जात येत असायचो तेव्हा ‘स. भु.' ची कॉलेज कन्यका होती.
 सरांनी आणि काकूनी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली होती.
 आणि जया होती पण तशीच - लाखात देखणी, अति हुशार आणि स्मार्ट ... चतुरस्र व्यक्तिमत्त्व. देव एखाद्याला भरभरून देतो ते असं!
 मला ती फार आवडायची. तिचं एक जीवघेणं आकर्षण आणि सततची ओढ चित्तात ठसली होती. पण मला माझ्या भावना त्या वेळी कधीच प्रकट करता आल्या नाहीत.
 कारण सर माझं एक श्रद्धास्थान होतं. या अनाथ मुलाला त्यांनी माया दिली, मार्गदर्शन केलं. मी कोण कुठला. कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांमधला मी एक, तरीही माझ्या बुद्धिमत्तेचं त्यांनी कौतुक केलं आणि विषयाच्या निवडीत मार्गदर्शन केलं. आजही मागे वळून पाहिलं, तर त्यांचं मार्गदर्शन केवढं अचूक होतं याची जाणीव होते. कारण शिक्षणक्रमात आवडीचा विषय निवडणं आणि व्यवसायही त्याच क्षेत्रातला मिळणे हे दुर्लभ भाग्यच म्हणायला हवं. ते माझ्या वाट्याला आलं ते सरांमुळे.
 त्यामुळे त्यांच्या लाडक्या लेकीचा हात मागण्याचं माझं धाडस झालं नाही. एक तर मी अनाथ, रूपानं जेमतेम, आणि नोकरी एका प्राध्यापकाची - तीही जुनियर स्केलमध्ये ....
 एखाद्या राजकुमाराचं आयुष्य फुलवण्याचे सामर्थ्य आणि सौंदर्य असलेल्या जयाच्या कपाळी ‘पांढच्या पायाची' म्हणून शिक्का बसला होता.

 त्या रात्री मी झोपू शकलो नाही. मनात ब-याच दिवसात न पाहिलेल्या, पण मनमानसात पूर्ण सौंदर्यखुणांसह ठसलेल्या जयाच्या भवितव्याची भेसूर, वेडीवाकडी

लक्षदीप । ५३