पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रथम प्रसूती, तीही सुखरूप आणि वर मुलगा झालेला - अशा वेळी स्त्रीला जगज्जेत्याचा आनंद होत असतो.
 जयाच्या या आनंदात माझ्या पत्रानं विरजण तर घातलं नाही ना गेलं?
 जया - माय डियर - माय डार्लिंग - मला माफ कर - माझा हेतू तू समजशील तसा नाहीये - आणि कधीच नव्हता.
 माझ्या हातात मनीपर्स होती - उघडलेली. पेनटॉर्चनं मी त्यात लावलेला जयाचा हसरा फोटो पाहत होतो.
 मी जयाला पत्रात लिहिलं होतं.
 “कॉग्रेच्युलेशन जया, पुन्हा एकवार अभिनंदन! आपला मुलगा मला फार आवडला. कोणी काही म्हणू दे, मला वाटतं.. तो तुझी प्रतिकृती आहे... मी तुझं बालरूप पाहिलं नाही. ते पाहायची तीव्र इच्छा व्हायची. तुझ्या अवखळ सान्निध्यात दैवयोगानं आता ती पुरी होतेय. हा आपला पुत्र दिसामासांनी वाढताना पाहीन. त्याची बदलते रूप पाहीन आणि कल्पना करीन की, माझी जया लहानपणी अशीच असणार म्हणून. तू माझी पत्नी आहेस, सखी-सचिव तर आहेसच. आता बाळराजाच्या प्रतीकातून कन्या म्हणून मी तुझ्याकडे पाहणार आहे. हा अनुभव केवढा एक्सायटिंग असेल नाही का? कल्पनेनंच मी रोमांचित झालो आहे. तू आता लवकर ये बाबा माझ्या घरी.... तुझ्याविना मी हे चार महिने कसे काढले ते माझे मलाच माहीत.
 आणखी एक सजेशन - आपण मुलाचं नाव ‘मकरंद ठेवू या का....? चॉईस तुझा राहील. पण हे नाव ठेवावं असं मला वाटतं."
 पत्रातला हा शेवटचा पॅराच आज माझ्या काळजात सल बनून राहिला आहे.
 मकरंद नावाची सूचना मी का केली?
 जया कशी रिअॅक्ट करेल याला?
 मनाची अस्वस्थता वाढत होती, बेचैनीचा पारा झरझर झरझर चढत होता.
 मकरंद, मी त्याला कधीच पाहिलं नाही. तरीही त्याचं अस्तित्व माझा पिच्छा सोडीत नाही.
 जया त्या संदर्भात माझ्याशी प्रत्यक्ष कधीच बोलली नाही. फक्त विवाहापूर्वी एकदा पत्रानं तिनं मनोगत व्यक्त केल होतं एवढंच.
 सरांनीही मला पुन्हा पुन्हा बजावलं होतं.
 “हे पाहा, तू माझा आवडता विद्यार्थी आहेस. तरीही तू विचार बदलू शकतोस. मी काही वाटून घेणार नाही. माझी पोर - जया बेटी - फार स्वाभिमानी आहे. तिला आणि मलाही दया नकोय. भीक तर नकोच नको....

 सर साता-याला आले तेव्हा आग्रहाने मी त्यांना माझ्या दोन रूमच्या ब्लॉकवर ठेवन घेतलं होतं. ते फार काळजीत होते. मी जेव्हा त्यांना खोदन खोदन विचारलं

५२ L लक्षदीप