पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३. अंतरीच्या गूढ गर्मी



 आपण ते पत्र लिहायला नको होतं!' कंडक्टरनं बेल दिली आणि सुपर एक्सप्रेस सुरू झाली. सातारा शहर काही मिनिटांत मागे पडलं. माझ्या हातात एक पुस्तक होतं, पण मी वाचत नव्हतो. डोळे सवयीनं त्या काळ्या शब्दांवरून फिरत होते, पण चेतनेत एकही शब्द अर्थबोध घेऊन येत नव्हता. रात्रीचे साडेनऊ झाले होते. सहज घड्याळाकडे नजर गेली तेव्हा वेळेची जाणीव झाली. ही एक संवेदना - तेवढंच मनात विषयांतर होतं!
 आता रातराणीमधले दिवे विझले होते. आणि राजरस्त्यावरून बस सुसाट वेगाने धावत होती. बहुतेक सहप्रवासी पेंगले होते. मी मात्र लख्ख जागा होतो...
 "आपण ते पत्र लिहायला नको होतं.."
 जयाला ते काल किंवा आज नक्कीच मिळालं असणार. काय वाटलं असेल तिला पत्र वाचल्यानंतर?
 कोणत्या ऊर्मीत आपण ते पत्र लिहिलं की - आपण जराही विचार केला नाही तिच्या मनाचा.
 आधीच ती भरली बाळंतीण आहे. शरीर व मन या वेळी फारच हलकं असतं असं वडीलधारे म्हणतात. अशा वेळी माझं ते वेडं, आवेगी पत्र....
 ओ गॉड? हे मी काय करून बसलो? मानसशास्त्राचा प्राध्यापक म्हणून घेतो स्वत:ला; मी मला हे समजू नये की, प्रसूतीनंतर जन्म दिलेल्या अपत्याच्या संदर्भात एका निखळ, कौतुकभरल्या तृप्त वात्सल्याखेरीज नवजात मातेला काही कळत नाही.
 जया पत्रातला मजकूर कसा घेईल?
 आता माझ्यातला मानसशास्त्रज्ञ जागा झाला होता. शक्यता ही पण आहे की, तिला हे फार खटकेल, तीव्रतेने खुपेल. ती माझी पत्नी जया आत्यंतिक विव्हळ होईल...

 उद्या सकाळी औरंगाबादला आपण सासुरवाडीत जाऊ तेव्हा जयाचं कोणतं दर्शन घडेल?

लक्षदीप । ५१