पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डोळ्यांचे बांध फोडून वाढू लागला.
 बंडूचं निष्प्राण कलेवर कवटाळून ती किती वेळ अश्रू ढाळीत होती...!
 अजूनही बंडूच्या चेह-यावर थरारकतेचे भाव होते. होय, त्यानं मा. नंदूची शेवटची कथा ऐकली होती व ती कथा ऐकतानाच त्यानं डोळे मिटले होते.... शांतपणे! त्याला कसली समज होती? देवाघरचा तो निष्पाप जीव कोणतं प्रायश्चित्त घेण्यासाठी या जगात आला होता, की....
 प्रियूला आठवत होतं.. आपण सांगितलेली मा. नंदूची साहसकथा आणि बंडूचे मिळणारे उत्कट रिस्पॉन्सेस्. मा. नंदू आणि बंडू तिचेच पुत्र होते! एक प्रत्यक्षातला. दुसरा कल्पनाशक्तीतला - मानसपुत्र - तिला नंदू हवा होता पण मिळाला बंडू.
 पण इतरांना न मिळालेलं एक वरदान तिला मिळालं होतं. कलात्मक निर्मितीचं. आपल्या प्रतिभेनं हवी ती व्यक्तिरेखा ती निर्माण करू शकत होती. तिच्या प्रतिभेनं मा. नंदूला जन्म दिला होता. तो काल्पनिक होता, पण त्याच वेळी फार खरा होता. मनाच्या गाभा-यात, वात्सल्याच्या उमाळ्यात.
 आता बंडू नव्हता आणि म्हणूनच नंदूचे प्रयोजन नव्हतं!
 नंदू बंडूसाठी होता म्हणूनच साच्या बालकांसाठी होता - बंडू मेला तर नंदूही -
 येस... त्याचाही मी शेवट करणार आहे...! ती तशीच उठली. झपाटल्यासारखी टेबलाजवळ गेली, कागद ओढले व लिहू लागली.. मघाशी जिवंत असताना बंडूला सांगिलेली तीच कथा, पण शेवट वेगळा असलेली.
 प्रत्येक कथेत कितीही खडतर प्रसंग आला तरी त्यातून मा. नंदू आपल्या बुद्धिमत्तेने व त्याला मिळालेल्या जादूई वस्तूमुळे सहीसलामत सुटत असे..... पण आज प्रियूनं कथेत दाखवलं होतं - त्याला मिळालेली जादूची छडी पाण्यात पडून जाते आणि राक्षसाला मारताना तो स्वत:ही मरतो!
 लिहिताना एकदम तिला आठवलं व ती थरारली - हे ‘मर्सी किलिंग' आहे. का? मा. नंदूचं? बंडूला मात्र माझ्या माघारी त्रास होऊ नये म्हणून मला ‘मर्सी किलिंग' हवं होतं पण मातृप्रेमामुळे ते मला कधीही जमलं नाही. मा. नंदू हा प्रतिभेचा अविष्कार आहे. माझा मानसपुत्र आहे. त्याला मी किती सहजासहजी मारलं ... कथेतच.
 हे... हे मर्सी किलिंग आहे? छे, ते तर कसलं ब्रटल किंलिंग झालं. आई नाही, जखीण करील असं... यापुढे मला मा. नंदूच्या साहसकथा येणार नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
 त्यासाठीच...
 प्रियूने बालविश्वाच्या संपादकाला ते शहर सोडण्यापूर्वीच एक पत्र लिहून ठेवले.

 "तुमचा व माझ्या असंख्य बालकवाचकांचा मी आग्रह मानू शकत नाही.यापुढे

लक्षदीप ॥ ४९