पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/465

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अजरामर ठरणारे बनलेच होते. पुन्हा भारतीय नृत्य-गीत शैलीशी (Narrative)फारकत घेत जागतिक सेन्सिबिलिटी (पक्षी : वेस्टर्न सेन्सिबिलिटी) अनुरूप सत्यजित रे नी चित्रपट बनवले होते, जे गुरूच्या प्रकृतीत बसणारे नव्हते. कारण तो उदय शंकरच्या तालमीत तयार झालेला नर्तक होता, त्याला संगीताचं उत्तम भान होतं आणि कॅमेच्याद्वारे कृष्णधवल छाया - प्रकाशाचा तर तो भारतातील सर्वश्रेष्ठ जादूगार होता.त्यानं आपली स्वत:ची स्वतंत्र चित्रशैली कुणाचंही अनुकरण न करता घडवली होती.पाश्चात्त्यांना त्यातील गीत-संगीत व भारतीय परंपराशी इमान राखणारी पात्रे असल्यामुळे गुरूच्या चित्रपटांची महती त्याच्या हयातीत जाणवली नाही. त्यानंही जाणीवपूर्वक आपले सिनेमे परदेशात प्रदर्शित करण्याचा खटाटोप केला नाही. पण तरीही रेंच्या तोडीची प्रतिभा असतानाही त्याची लहरीनुसार चित्रपट करण्याची पद्धत आणि काही केलेल्या तडजोडीनं त्याला में प्रमाणे मान्यता मिळाली नाही. आणि त्याची त्याला मनोमन कुठेतरी खंत होती. दुखावलेपण होतं. वैयक्तिक अपयशासोबत हे कलात्मक अपयशानेही त्याला आत्मनाशाकडे खेचत नेलं असेल का?
 वहिदा रहेमानचा ‘गुरुजी आणि मी' हा गुरूवर त्याच्या मृत्यूनंतर लिहिलेला लेख मला गुरुदत्तच्या व्यक्तिमत्त्वातील त्याचं मृत्यूचं असणारं ऑबसेशनच्या संदर्भात महत्त्वाचा वाटतो. ती म्हणते ‘त्यांचे मृत्यूवर का प्रेम होतं? मृत्यू त्यांना का जवळ करावासा वाटला? ईश्वरानं त्यांना सारं काही दिलं होतं, पण संतुष्टता दिली नव्हती. कदाचित त्यांना आयुष्यात जे मिळू शकलं नाही ते मृत्यूत शोधायचं असेल, असमाधानाची वेदना जाणवणार नाही असा एक शेवट, एक पूर्णत्व, एक तृप्ती त्यांना मृत्यूमध्ये शोधायची असेल.”
 वहिदाला असंही मागे वळून पहाताना वाटलं की, गुरूला आत्मनाशापासून कोणी वाचवू शकलं नसतं. कारण त्याची जगण्याची इच्छाच हळूहळू संपत होती. आयुष्यात प्रत्येकाला सर्व काही हवसं वाटणारं मिळत नसतं, पण गुरूला ते मंजूर नसावं. त्याचा मृत्यू हा कदाचित अपघात असेल पण तो गुरुदत्तला हवासा होता हे मात्र नक्की. वहिदाला असंही वाटतं, जर या वेळी ते वाचले असते, तर त्याचं त्या नंतरचं जगणं हे मरण्यापेक्षा अधिक वेदनामय झालं नसतं, याची कोण हमी देऊ शकलं असतं?
 असं हे मी आकळलेलं गुरुदत्तचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या मनातली वादळं आणि देवदास-हॅम्लेटचं मिश्रण असलेलं आत्मनाशी जीवन. ते मला साहिरनं त्याच्यासाठी लिहिलेला एक शेर व गीताच्या एक कडव्यातून ब-याच प्रमाणात साकारलं आहे असं वाटतं. साहिरचा शेर प्रथम, तो असा आहे,

‘उभरेंगे एक बार अभी, दिलके खलबले
माना की दब गये हैं, गमे जिंदगीसे हम ।।
४६४ ■ लक्षदीप