पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अब्रार हा त्याची मनातली स्पंदनं टिपणारा जणू टीपकागद होता. तसेच अल्टर इगो पण होता. आणि मूर्ती गुरूला परिपूर्णता जीवनात जी मिळत नव्हती ती सिनेमाच्या प्रत्येक फ्रेम व सीनमध्ये उतरविण्यासाठी गुरूला मदत करणारा कॅमे-याचा जादूगार होता. 'वक्तने किया क्या हंसी सितम’ सारखी छायाप्रकाशाचा कलात्मक खेळ दाखवणाच्या असंख्य चित्रचौकटी गुरू-मूर्तीनं निर्माण केल्या, त्यावेळी गुरूला प्रज्ञा व प्रतिभेनं आपण जीवनात नाही तर किमान सिनेमात परिपूर्णता आणू शकतो, असं कलात्मक समाधान कलावंत म्हणून अनेकदा मिळालं असणार. पण प्रत्यक्ष जीवनातील विरह, दुरावा, सामाजिक बंधनांचा होणारा कांच, कला व धंद्याचा न जपणारा मेळ,कलात्मकतेचा बळी देत कधी कधी काही प्रसंगात करावी लागणारी नकोशी वाटणारी व्यावसायिक तडजोड - या बाबींमुळे जे न्यूनत्व येत होतं, अपूर्णता वाटत होती, खोल असमाधान होत होतं, ते त्याला खटकायचं. तीव्रतेनं बोचायचं. प्रेमातील अपयशामुळे मनस्वी घायाळ होणं ही तर त्याची ‘फितरत होती. या साच्यामुळे पदोपदी जाणवणारी अपूर्णता गुरुदत्तला सहन होत नसे. Perfect shot versus imperfect life असं त्यांच आयुष्यभराचं द्वंद होतं, ते मृत्यूनंच संपेल असं तीन वेळा अयशस्वी आत्महत्याच्या प्रयत्नाच्या वेळी त्याला नक्कीच वाटलं असणार. पण त्यातून वाचल्यावर जगावं लागणारं जीवन त्याला अधिक असह्य वाटत असणार. त्याची परिणिती अखेर दारू व स्लीपिंग पिल्सच्या जहरी व जीवघेण्या कॉकटेलनं झाली आणि एक अस्वस्थ आत्मा अखेरीस दारू व निराशा जवळ केल्यामुळे पोखरलेल्या व अकालीच थकलेल्या जेमतेम चाळीस वर्षाच्या देहकुडीतून अलग झाला. अविनाशी आत्मा हे मिथ खरं असेल तर गुरूच्या आत्म्याला सद्गती खचितच मिळाली नसणार, तो अंतराळात अश्वत्थाम्याच्या चिरंतन चिघळणाच्या जखमेप्रमाणे आपली अस्वस्थता कुरवाळीत भटकत असणार व नंतर ज्या ज्या मनस्वी कलावंतांनी आत्महत्या केल्या वा दारू व बेदरकार वागण्यानं ओढवून स्वनाश घेतला, त्यांना त्यानं पछाडलं असणार...

 देवानंद हा त्याचा जिवलग मित्र, त्याच्या मते गुरुदत्त हा melancholic होता.या शब्दाचा नेमका डिक्शनरी अर्थ आहे A feeling of sadness and being without hope आणि feeling/looking sad or making you feel sad असा होतो. देवच्या मते गुरूनं नेहमीच मानवी दु:ख आणि निराशांनी भरलेले चित्रपट बनवले. तो अपयश - जीवनातील असो वा सिनेमातील असो - सहन करू शकत नसे. अशावेळी कासव जसा आपलं शरीर कवचाच्या आत ओढून घेतो, तसा गुरू जगापासून स्वत:ला आपल्या कोषात व स्वेच्छेने पत्करलेल्या एकटेपणात दडवून घ्यायचा. देवचं हे निरीक्षण अत्यंत मार्मिक व गुरूच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारं आहे. तो गुरूला अधिक चांगला जाणू शकत होता. कारण तो त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा म्हणजे स्वच्छंदतावादी व यशअपयश दोन्हीचा समानतेनं स्वीकार करणारा

४६२ ■ लक्षदीप