पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/461

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक माणूस म्हणून एक कलावंत - फिल्ममेकर म्हणून अपूर्णत्व जाणवायचं.सिनेमाचा प्रत्येक सीन-प्रत्येक शॉट परिपूर्ण व्हावा असा त्याचा अट्टाहास असायचा; ते त्याला शक्य व्हायचं. कारण तो त्या सिनेमाचा दिग्दर्शक असायचा. सूत्रधार असायचा. पण माणसाच्या जीवनाचा सूत्रधार तर तो अज्ञात, वर बसलेला, जगन्नियंता आहे. माणसाच्या जीवनाची सूत्रं त्याच्या हाती आहेत व तो लहरी आहे. त्याची अँबस्ट्रक्ट कृती मानवी जीवनात प्रचंड विरोधाभास, कमालीची विसंगती आणि अर्तक्यता ठासून भरवते. ‘तीसरी कसम' मध्ये शैलेंद्रनं मोठ्या मार्मिकपणे यावर नेमकं भाष्य करीत त्या उपरवालाची लहरी मानसिकता या शब्दात व्यक्त केलीय. 'काहे बनाये तूने माटीके पुतले? धरती ये प्यारी प्यारी, चेहरे ये उजले! काहे रचाया तूने दुनिया का मेला? बोल ये क्या सुझी तुझको - काहे को प्रीत जगाई? तूने काहे को दुनिया बनाई?' गुरुदत्तला अपूर्ण, विसंगत जीवनाचा व अगम्य मानवी वर्तनाचा त्रास व्हायचा. त्याला सिनेमाच्या शॉटप्रमाणे जीवन पण परिपूर्ण व परफेक्ट हवं असायचं.पण ते शक्य नव्हतं, हे कटु सत्य त्याचं हटवादी मन मान्य करायला तयार नसायचं.त्यामुळे त्याच्या मनाची फरफट व्हायची. कदाचित वर नमूद केलेल्या पत्रात आपलं मन मोकळं करताना तो जीवनासंबंधी कसा कडवट बनत चालला होता याची स्वच्छ कबुली पत्नीपुढे दिली होती. एक काम सोडलं तर त्याला बांधून ठेवणारं व आनंदानं जगायला कारण ठरणारं १९५८ च्या आसपास काही उरलं नव्हतं. आणि त्यातचं ‘कागज के फूल' हा त्याचा त्यांच्या मॅग्नम ओपस असणारा चित्रपट पडला आणि तो जो मनानं कोलमडला, त्यातून सावरला गेला नाही. तरी अब्रार अल्वी, देवानंद, व्ही. के. मूर्ती व जॉनी वॉकरसारख्या मित्रांमुळे काही वर्षे जगला, पण त्याला मैत्रीपेक्षाही प्रेम व स्त्री सोबतचं परस्परात सारं काही विसरून एक वेगळी दुनिया निर्माण करणारं गाढ तृप्त सहजीवन हवं होतं. ते देण्याची क्षमता त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाच्या पत्नी गीता दत्त व प्रेमिका-सह कलाकार वहिदा रहेमानजवळ होती. पण गीता व त्याचं नातं म्हणजे एकत्र राहणं अशक्य व दूर होऊन अलग जगणं त्याहून मुश्किल असं होतं. तर वहिदाला कदाचित तो तिच्या एकटीचा हवा होता, पण तिला तसा गुरुदत्त मिळाला नाही व ती त्याच्या जीवनातून दूर झाली. तो पण दोघींचा पूर्णपणे झाला नाही, की त्या दोघी त्याला हव्या तशा प्रेम असूनही त्याच्या झाल्या नाहीत. त्यामुळे त्याची आत्मनाशाची वृत्ती बळावत गेली. पूर्वीपासून असणारा आत्महत्येचा विचार अधिकाधिक प्रिय होऊ लागला. इजा, बिजा व तिजा याप्रमाणे पूर्वी तीनदा त्याला त्यानं आत्महत्येचा प्रयत्न करूनही मृत्यूनं त्याला हुलकावणी दिली होती, पण चवथ्यांदा १० ऑक्टोबर १९६४ ला त्यानं मृत्यूला स्वत:च्या बाहुपाशात खेचून घट्ट पकडून ठेवलं व त्यांच्या समवेत तो आनंदाच्या यात्रेसाठी निघन गेला...

 कलावंत गुरुदत्त व त्याचे चित्रपट यावर भरभरून लिहिलं गेलं आहे, पण एक

४६० ■ लक्षदीप