पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/454

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐतिहासिक घटना कोणते प्रश्न उपस्थित करतात व त्यातून कोणता विचार स्वीकारला पाहिजे, याकडे कलात्मकतेची कास न सोडताही कार्नाड अंगुलीनिर्देश करीत विचार करायला बाध्य करतात.
 ७. अलीकडची कार्नाडांची नाटके आजच्या भारताचे प्रश्न, बदल व त्यातून निर्माण होणारे प्रश्न दाखवतात. 'वेडिंग अल्बम' मध्ये हिंदू विवाहपद्धतीच्या अनुषंगाने धर्म, रूढी व मानवी नात्यांची बदलती रूपे त्यांनी दाखवली आहेत, तर ‘उणे पुरे शहर एक' द्वारे छोटी शहरे जेव्हा वेगाने महानगरांची रूपे धारण करतात तेव्हा इथेही सीमेवर कसा ग्रामीण माणूस फेकला जातो व एका अर्थानं शहरातही झोपडपट्टीच्या रूपाने नवे गांवकूस कसे निर्माण होत आहे हे दाखवतात. ‘ब्रोकन इमेजेस'द्वारे इंग्रजी विरुद्ध देशी भाषा व साहित्य व त्यातलं राजकारण दाखवतात. म्हणजेच त्यांच्या प्रतिभेनं नवं वळण घेतलं आहे व नवे विषय नव्या पद्धतीने ते प्रभावीपणे मांडताना दिसतात.
 सारांश, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेल्या गिरीश कार्नाडांनी कन्नड रंगभूमीबरोबर भारतीय रंगभूमी पण समृद्ध केली आहे.

०-०-०

लक्षदीप ■ ४५३