पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/453

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ताजं नाटक वेगानं बदलणा-या शहराचं वास्तव पण अंर्तमुख करणारं चित्रण करतं! उपसंहारे
 असा हा गिरीश कार्नाडांचा पन्नास वर्षाचा नाट्यसंसार. मी प्रामुखाने त्यांच्या लिखित व प्रकाशित इंग्रजी - मराठीतील अनुवादित नाट्य-संहितांच्या पुस्तकांचा विवेचनासाठी आधार घेतला आहे. त्यांनी भारतीय रंगभूमीला दिलेले योगदान किती महत्त्वाचं आहे हे वरील विवेचनावरून स्पष्ट होतं. तरीही समारोप करताना सूत्ररूपानं मी खालीलप्रमाणे निष्कर्ष नोंदवतो.
 १. पुराणकथा व मिथकांचा आधार घेऊन कर्नाडांनी जी नाटकं लिहिली,त्यामागे भारतीय रंगमंचाचा डोळस शोध होता व त्यामुळे पाश्चात्त्य प्रोसेनियम पलीकडेही समृद्ध अशी भारतीय परंपरेतून विकसित झालेली भारतीय / कन्नड रंगभूमी आहे, तिचा वापर करून आजचे आधुनिक प्रश्न समर्थपणे मांडता येतात. 'Discovering our roots for inventing truly Indian theater is the significant contribution of Girish Karmad,
 २. ‘तुघलक’, ‘टिपू सुलतानाची स्वप्ने' व 'तलेदंडा' व 'बळी' या नाटकांद्वारे ऐतिहासिक नाटकाची सशक्त परंपरा कर्नाडांनी सुरू केली. त्यातील व्यामिश्रता व इतिहासातून वर्तमान प्रश्नांचा शोध कसा घेता येऊ शकतो याचा सुरेख वस्तुपाठ गिरीश कर्नाडांनी दिला आहे.
 ३. त्यांची नाटकं रंगमंचावर सादर करणं हे भारतीय रंगकर्मीसाठी सदैव आव्हान होतं. एवढी सकस व भारतीय परंपरेतली पण आधुनिक संवेदनशीलतेची नाटकं कर्नाडांची आहेत. विजया मेहता, अलेक पदमसी, अरुंधती नाग, सत्यदेव दुबे आदींना ती रंगभूमीवर आणावीशी वाटली व त्यातून त्यांना नवा फॉर्म व आशय शोधता आला, ही किमया कर्नाडांच्या प्रतिभेची आहे.
 ४. एकविसाव्या शतकाच्या मध्यापासून गिरीश कर्नाडांच्या प्रतिभेने नवे वळणे घेतले आहे. वेडिंग अल्बम' व 'फ्लॉवर्स' ही दोन मोनोलॉग फॉर्ममधली नाटके व त्यासाठी नव्या तंत्राचा वापर यामुळे त्यांच्यातली प्रतिभा अद्यापही टवटवीत आहे व नवे प्रयोग करणे हा त्यांचा साहित्यिक धर्म आहे याची पुन्हा खात्री पटते.
 ५. कार्नाडांनी सतत स्त्री प्रश्नांच्या, खास करून तिच्या लैंगिकतेचा, प्रेम व वासना, पुरुषसत्ताक समाजात तिची होणारी कुचंबणा, दुय्यमत्व व प्रसंगी निष्फळ ठरणारी बंडखोरी नाटकातून व्यक्त करताना आधुनिक स्त्रीवादाच्या परिप्रेक्ष्यात पुरोगामी भूमिका घेतली आहे व प्रेक्षकांना विचाराला प्रवृत्त केले आहे.

 ६. ऐतिहासिक नाटकातून आधुनिक भारतातील महत्त्वाचे प्रश्न, जसे की आदर्शवादाचा पराभव, मूल्यांची घसरण, निघृण सत्तासंघर्ष व सत्ता हेच साध्य व साधन मानणं, धार्मिक उन्माद, जातीय संघर्ष कार्नाडांनी प्रभावीपणे मांडले आहेत.

४५२ ■ लक्षदीप