पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/444

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्री, समाज, वर्ण व धर्माच्या भिन्नवर्गी द्वंद्वाचा संघर्ष या नाटकात दिसून येतो. तिचा हा व्यभिचार धर्म व पुरुषप्रधान वर्चस्वाला आव्हान देणारा ठरतो. पावित्र्य हे केवळ पुरुषप्रधान वर्चस्वानं रूढ झालेल्या नीतिकल्पनांच्या आधारे न ठरवता ते व्यक्तीच्या ज्ञान-अनुभव व नैतिक कल्पनेच्या आधारे जाणणे ही आपल्या विवेकवादाची कसोटी आहे, हे मोठ्या खुबीनं या नाटकाद्वारे प्रत्ययास येते.
 सारांशरूपाने सांगायचं झालं तर ‘हयवदन’ ‘नागमंडल' व 'बळी' या तीनही मिथक आधारित नाट्यकृतीतून गिरीश कार्नाडांनी आपल्या काळाचे नैतिक प्रश्न व स्त्री-पुरुष संबंधातील गुंतागुंत व्यक्त केली आहे. पुरुषाची बालपण ते किशोरपण व किशोरपणातून पुरुषत्वाकडे होणारी वाटचाल, स्त्रीकडे हाडामासाचं समान दर्जाच माणूस म्हणून पाहात झाली तर स्त्रीची तेव्हा व आताही होणारी घुसमट कमी होऊ शकते, हे या नाटकातून कलात्मकतेनं अधोरेखित होतं!

चार
ऐतिहासिक नाटकातून उलगडणारं आजचं वर्तमान :
‘तुघलक' ‘टिपू सुलतानाची स्वप्ने' व 'रक्त कल्याण' नाट्य

 गिरीश कार्नाडांनी ‘ययाती' या पहिल्या नाटकानंतर दुसरं नाटक ‘तुघलक लिहिलं. त्यांच्या वाचण्यात योगायोगानं कीर्तीनाथ कुर्तकोटीचं कन्नड साहित्यावरच पुस्तक त्या काळी वाचनात आलं व एका टिप्पणीनं ते विचारात पडते. कुर्तकोटाच्या मते ज्याप्रमाणे शेक्सपियर व ब्रेश्टनी दर्जेदार ऐतिहासिक नाटकं लिहिला, तर भारतीय नाटकाकरांनी लिहिली नाहीत. या टिप्पणीनं गिरीश कार्नाडांना प्रेरणा मिळाली व ऐतिहासिक नाटक लिहावंसं वाटलं. त्यांना आपल्या 'खेळता खेळता आयुष्य या आत्मचरित्रात नाट्यलेखनाची प्रेरणा व प्रक्रिया खालीलप्रमाणे कथन केली आहे.
 ‘नडेदु बंद दारि' मधल्या कीर्तीनाथ कुर्तकोटींच्या प्रस्तावनेनं माझ्यासाठी दरवाजा उघडला, नवा परिप्रेक्ष्य (पर्सपेक्टिव्ह) दाखवून दिला. मला डिवचलं. तिथे त्याना कन्नड नाटकांवर केलेली टिप्पणी माझ्या नजरेला पडली. “...तरीही ऐतिहासिक विषय घेऊन त्याच्या संदर्भात सत्याचे नवे पदर शोधून काढायचा प्रयत्न कुणीही कलला नाही. जुन्याचं पुनरुज्जीवन करण्याबरोबर जुन्याकडे नवेपणानं बघायची दृष्टी आपल्याकडे आली पाहिजे. इतिहासाचा कच्चा माल वापरून नव्या कलाकृती जन्मल्या पाहिज: इतर क्षेत्रांत शॉ-इब्सेन आदर्श झाले तसे आपल्याकडेही झाले पाहिजेत. 'सीझर अण्ड क्लिओपात्रा’ आणि ‘सेंट जोन’ सारखी एक तरी कलाकृती कन्नड भाषेत निर्माण न होणं ही शोचनीय अवस्था म्हटली पाहिजे..."

 हा लहानसा परिच्छेद मी वाचला आणि मला वाटलं, ‘का नाही? मला माझ्या वडिलांकडून इतिहासप्रेम वारशात मिळालं होतं. शिरसीमध्ये तेरा-चौदा वर्षांचा असताना

लक्षदीप ■ ४४३