पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रियूची नाराजी पाहून गडबडून तो पोस्टमन म्हणाला, “पण एक सांगावसं वाटलं बाई-"
 "काय?"
 "तुम्ही नंदूला इतक्या लवकर मारायला नको होता. त्याच्या साहसकथा मुलांना काय आवडायच्या! माझा मुलगा गंगाराम तर दरमहा एक तारखेची वाट पाहायचा ‘बालविश्व'चा अंक केव्हा येतो व केव्हा एकदा मा. नंदूची कथा वाचतो, असं त्याला व्हायचं."
 ती ऐकत होती. एकाच वेळी आपल्या कथांची होणारी तारीफ पण तिला ऐकाविशी वाटत होती आणि नकोशी वाटत होती! नेमकी न कळणाच्या शब्दांत न पकडता येणारी एक अनाम हुरहुर तिला घेरून गेली.
 “गंगारामच काय, त्याचा हा बाप, मीही नंदूच्या कथा वाचायचो बाई. आपण फार छान लिहिता-” पोस्टमन ती ऐकत आहे हे पाहून धीर धरून पुढे म्हणाला, “गेले पंधरा दिवस मी रोज विचार करीत होतो, बोलायला धीर होत नव्हता बाई. नंदूची शेवटची साहसकथा या महिन्याला ‘बालविश्वात प्रसिद्ध झाली तेव्हा तमाम बालवाचकांप्रमाणे मीही हळहळलो बघा. ते तुम्ही बरं नाही केलं! प्रत्येक बालकच स्वत:मध्ये मा. नंदूचं रूप पाहात होता. माझ्यासारखा त्यात आपल्या आदर्श मुलाचं रूप पहात होता."
 ती आतल्या आत ढासळत होती. जो निश्चय तिने मनोमनात केला होता तो ढेकळासारखा विरघळला तर जाणार नाही ना? असं तिला वाटू लागलं. ती किंचित ओरडून म्हणाली, “नाही. मी पुन्हा लिहिणार नाही नंदूची साहसकथा. ते - ते मला शक्य नाही."
 "नाही बाई, तुम्हाला ते शक्य आहे आणि आता मा. नंदूवर केवळ तुमचाच नाही, तर सर्वाचा हक्क आहे-”
 “मला ते नाकबूल कुठे आहे? - त्यांच्यासाठीच तर मी लिहिलं होतं...."
 “व या पुढेही लिहिलं पाहिजे-!" पोस्टमन म्हणाला, “आमच्या जातीनं पत्रं वाटताना एवढं बोलू नये, पण तुम्ही एक महान लेखिका आहात. सर्वच बालगोपाळांच्या लाडक्या प्रियूदीदी आहात.... व मला माझ्या धाकट्या बहिणीप्रमाणे, म्हणून एवढं बोललो-!"
 पोस्टमन जाताजाता पुन्हा थबकला - व वळून म्हणाला - “मला वाटतं दीदी, काही दिवस तुम्ही हवापालट करायला कुठे दूर हिल स्टेशनला जा - मनाला तेवढंच बरं वाटेल! तुमचा बंडू गेल्याचं कळलं.... भारी वाईट वाटलं. त्या पुत्र- शोकामुळेच तुम्ही लिहायचं नाही असं ठरवलं असाल तर मला म्हणायचं आहे की..."

 “स्टॉप - एक शब्दही पुढे बोलू नकोस... मला ते ऐकायचं नाही. मला

४४ । लक्षदीप