पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/431

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१.गिरीश कार्नाड -भारतीय रंगभूमीचा एक ‘जायंट'


१.
गिरीश कार्नाड - ‘एक रेनेसन्स मॅन’

 आधुनिक भारतीय रंगभूमी (National Theater) ख-या अर्थाने सिद्ध होण्यामध्ये मोहन राकेश व धर्मवीर भारती (हिंदी), विजय तेंडुलकर (मराठी), आणि बादल सरकार (बंगाली) या नाटककारांसोबत गिरीश कार्नाड (कन्नड) याचं योगदान सर्वाधिक महत्त्वाचं आहे. इतरांच्या तुलनेत गिरीश कर्नाडांची सर्वच नाटके इंग्रजीत व अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाली व ती अनेक दिग्गजांनी रंगभूमीवरही सादर केली, त्यामुळे एका अर्थाने भारतीय इंग्रजी रंगभूमीचे त्यांना जनकत्व जाते, असे काही अभ्यासक मानतात. हा मुद्दा जरी विवाद्य असला तरी त्यानं कार्नाडांचं इंग्रजी रंगभूमीवरचं महत्त्व व दिलेले योगदान अधोरेखित होतं, एवढं तरी निर्विवादपणे म्हणता येईल, ते एकाच वेळी नाटककार, नट, दिग्दर्शक, समीक्षक, अनुवादक व सांस्कृतिक प्रशासक अशा अष्टपैलू भूमिका समरसतेने व प्रभावीपणे बजावीत असल्यामुळे त्यांना कादितारु व मर्चट यांनी समर्पकपणे 'Renaissance Man' असे संबोधलं आहे. त्यांचा प्रभाव हा सर्वदूर व सर्वभाषिक आहे. मराठीचं उदाहरण देऊन ते स्पष्ट करता येईल, विजया मेहतांनी त्यांची ‘हयवदन' व 'नागमंडल' ही नाटकं दिग्दर्शित केली. “आविष्कार ने तुघलक' केलं. रिमा लागूला ‘प्रतिबिंब (Broken images) करावसं वाटलं, 'आसक्त' नं त्याचं बेंगलोर शहरावरचं आजचं ताजं नाटक पुण्याच्या पाश्र्वभूमीवर 'उणे पुणे शहर एक' या नावानं केलं व कन्नड़पेक्षाही त्याचा प्रयोग सरस झाल्याचा खुद्द कार्नाडच निर्वाळा देतात. त्यांच्या बहुतेक नाट्यसंहिता मराठीत अनुवादित होऊन प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचे आत्मचरित्रही मराठीत खेळता खेळता आयुष्य' या शीर्षकाखाली उमा कुलकर्णीनं अनुवादित करून कार्नाडांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘आशय' नं त्यांचा काही महिन्यापूर्वी पुण्यात तीन दिवसाचा महोत्सव घडवून आणला त्यावेळी ‘राजहंस' ने ते दिमाखात प्रसिद्ध केलं होतं. हा तीन दिवसाचा महोत्सव म्हणजे त्यांची

४३० ■ लक्षदीप