पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. मर्सी किलिंग



 पोस्टमन आज जो केवळ भूतकाळाचा भाग आहे अशा एका गुलाबी कालखंडात प्रियूनं रघूला शेकडो भावोत्कट प्रेमपत्रं लिहिली होती व त्याचीही तेवढीच आली असतील. त्या काळात पत्र आणणारा पोस्टमन 'मेघदूतातील' यक्षाहून कमी महत्त्वाचा वाटला नव्हता. ज्याची सर्वस्व देऊन पूजा केली, तो रघू मातीचे पाय घेऊन आला होता चिखलातील, तिच्या देहाच्या उपभोगाचा हवा तेवढा हविर्भाग स्वीकारून पुन्हा नामानिराळा होऊन गेला... त्यावेळी चिडून, संतापानं त्याची निर्भत्र्सना करणार खरमरीत पत्र प्रियूनं लिहिलं, तेव्हा तिने मनोमन निश्चय केला होता - ते कदाचित अखेरचं पत्र आहे मी लिहिलेलं. यापुढे पत्र नाही लिहायचं - कुणा कुणालाही..
 पण जसं तिनं मास्टर नंदूची साहसकथा लिहायला प्रारंभ केला, तिला आपला पत्र न लिहिण्याचा निश्चय मोडावा लागला. मा. नंदूच्या साहसकथेवर निहायत खूश असलेल्या बालवाचकांची ‘प्रियूदीदी' अशी संबोधन असलेली निरागस भाबडी पत्रे तिला हेलावून गेली... बालवाचकांचा हिरमोड करणे तिला जमले नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत मोठ्या दीदीप्रमाणे पत्रोत्तर लिहू लागली. पत्रलेखनात तिला तिचा हरपलेला विरंगुळा सापडू लागला.
 पण आज पुन्हा एकदा तिला निश्चय करावा लागत होता. पत्र न लिहिण्याचा, एवढंच नाही तर आलेली पत्रे न वाचण्याचा. पोस्टमननं पुन्हा पुकार केला तेव्हा अनिच्छेने उठली. दार उघडलं. पत्रांचा एक गठ्ठाच घेऊन पोस्टमन उभा होता. बाई, ही डाक घ्या.." तो म्हणाला, “आज सतत पंधरा दिवस होताहेत, रोज एवढा डाक येत आहे."
 "हं....' ती अनिच्छेने हुंकारली.
 "मला वाटतं. सगळी बालवाचकांची पत्र आहेत .... आज तर माझ्या पाच पत्र आहे.."
 "तुला इतर घरी पत्रं वाटायची नाहीत का?”

 "जातो बाई..."

लक्षदीप । ४३