पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/413

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी श्रद्धा आहे की, तिनं केवळ दूध पाजलं नाही, तर तत्त्वज्ञान पाजलं. लाल देडप्रमाणे हिंदू त्यांना सहजानंद या नावानं ओळखतात किंवा नंद ऋषी; तर मुसलमान त्याला शेख नुरुद्दिन म्हणून. त्याचा ‘नूरनामा' हा काव्यसंग्रह काश्मिरी भाषेचा अमूल्य ठेवा आहे. त्याची समाधी चरारे शरीफला आहे. तेथे दरवर्षी मोठा उरूस भरतो व त्याला हिंदू-मुस्लीम दोघेही मोठ्या संख्येने जमतात व त्याची अजरामर काव्यगीतं गातात.
 नंद ऋषी हा कमालीचं साधं जीवन जगला. खडबडीत वुलनचा फेरन हा पोशाख तो करायचा, पायात लाकडी खडाव व कोन असलेली, डोईस घट्ट बसणारी टोपी. आज आम काश्मिरी हाच पोशाख वापरतो. नुरुद्दिन फक्त जंगली पानांचं अन्न म्हणून सेवन करायचा. तो नित्य नियमानं नवीन झाडे व रोपं लावायचा.
 त्यानं श्रोक या काव्य प्रकारात आपल्या रचना केल्या. त्याची व लाल देडची आध्यात्मिक व तात्त्विक दृष्टी व विचार समान होते. त्यानेही दोन्ही धर्मात एकोपा व बंधुभाव राहावा अशीच शिकवण दिली.
 त्याची ही काव्यरचना पाहा व तिचे तुकोबा - कबीराशी असलेलं साम्य वे क्रांतदर्शित्व सहजतेनं ध्यानात येईल.

'For true workshop of God
Do not go to Shaikh or priest or Mullah;
Do not feed the cattle on poisonos leaves.
Do not shut yourself,
Up in mosques or forests;
Enter your own body,
Control your breath,
And commune with God.

 चैनुद्दीन अबिदिनचा बाप सिकंदर हा हिंदूद्वेष्टा होता. त्याच्या काळातच नंदऋषी उर्फ नुरुद्दिन होता. हिंदू - मुस्लीम हा धर्म भेदभाव त्याला साफ नामंजूर होता. त्यानं सिकंदरला विरोध करीत एक श्लोक लिहिला, तो असा आहे -
 ‘आम्ही एकाच आई बापाचे आहोत.
 तर मग हा भेद का?
 आपण हिंदू व मुस्लीम एकत्रित
 देवभक्ती करू या.
 आपण या जगात भागीदार म्हणून आलोत,

 सुख-दुःख आपण एकत्रित भोगू या.'

४१२ ■ लक्षदीप