पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/412

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'वाख' काव्य प्रकारात प्रामुख्याने रचना करून लोकांना मानवतावाद व बंधुभाव शिकवला. तिच्या काव्यरचनेचा प्रधान उद्देश हा तत्त्वज्ञानात क्रांती करून ते सुलभ करणे व सांस्कृतिक परंपरेचं पुनरुज्जीवन करणे हा होता.
 लाल देड ही तिच्या जीवन काळातच एक दंतकथा बनली होती. तिच्या प्रभावी काव्यरचनेनं व त्यातून मिळणा-या आध्यात्मिक मार्गदर्शनानं हिंदू व मुस्लीम दोघेही तिच्याकडे आकृष्ट झाले. हिंदूंसाठी ती लल्लेश्वरी होती तर मुस्लीमांसाठी आरीफ लैला, तिचं काव्य माणसांच्या अंतरात्म्याला साद घालणारं होतं. तिला मंदिर-मशीद,पूजारी-मौलवी व रूढी-परंपरेचा तिटकारा होता. तिचा हा एक प्रसिद्ध वाख पहा -

‘शिव चुई थाली थाली रोझन
मो झन हिंदू ला मुसलमान
युट ऐ चूक पान जनुन परझान व
सोय चाई साहिवास सती झनिये झन'

 (शिव (शंकर) हा सर्वत्र राहातो. हिंदू व मुस्लिमांना विभाजित करू नका. बुद्धी वापरून स्वत:ला ओळखा. हाच ईश्वराला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.)
 तिच्या काव्यात गूढ शैव तत्त्वज्ञान व इस्लामच्या सूफी विचारांचा सुरेख संगम दिसून येतो.
 तिचा आजच्या काळातही क्रांतिकारी वाटणारा हा वाख जे. एल. कौल यांच्या भाषांतरित पुस्तकातून उधृत केला आहे -

'Idiolis of stone, temple is of stone
Above (temple) and below (idol) are one.
which of them shall thou worship,
oh, foolish Pandit?
Cause thou the union of mind with soul.'

 लाल देडच्या काव्य रचनांमुळे काश्मीरमध्ये एक प्रकारची वैचारिक क्रांती होऊन प्रबोधनाची पहाट उगवली. तिने बेकार रूढी परंपरा, आंधळ्या श्रद्धा आणि जातीचा अभिमान यावर कठोर प्रहार केले. ती तुकाराम, कबीर परंपरेतली भक्तीच्या परिघात क्रांतिशील कवयित्री होती. तिच्यामुळे काश्मिरी भाषा हीं समृद्ध बनली आणि काश्मीरियतचा अतूट हिस्सा बनली.

 सूफी संत नुरुद्दिन हा पहिला मुस्लीम संत होता, ज्याला ऋषी पद बहाल केलं गेलं आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ऋषी-सूफी परंपरा काश्मिरात सुरू व समृद्ध झाली. तो लाल देडचा समकालीन नसला तरी तिच्या पाठोपाठ त्याची काव्यरचना जन्मास आली, असं म्हणतात की, लाल देडनं त्याला आपलं दूध पाजलं होतं. काश्मिरींची

लक्षदीप ■ ४११