पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/407

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 काश्मीर प्रश्नाचं एक गंभीर स्वरूप म्हणजे धोक्यात आलेली काश्मीरियत होय. काश्मीरियत ही कार्य संकल्पना आहे? ते तत्त्वज्ञान आहे की जगण्याची एक रीत आहे? काश्मीरच्या नागरिकांची भारताहून अलग - पाकिस्तानपेक्षा सर्वस्वी भिन्न अशी ओळख - आयडेंटिटी आहे का? या प्रश्नांचा विचार करणे आवश्यक आहे. आज तथाकथित 'आझादी' साठी ‘जंग छेडणा-यांमुळे व जहाल धर्मवादाचा आश्रय घेत दहशतवाद हे राज्याचे नीतिधोरण (Instrument of State policy) म्हणून राबवत भारताला हजार जखमा करीत रक्तबंबाळ करण्याच्या पाकिस्तानच्या धोरणामुळे काश्मीरचे अभूतपूर्व वैशिष्ट्य असलेली काश्मीरियत धोक्यात आली आहे. १९९० च्या काळात काश्मीर खो-यातून जवळपास सर्वच काश्मिरी हिंदू पंडितांना आपले घर- गाव सोडून देशातच निर्वासित व्हावं लागल्यामुळे त्यांच्या सह अस्तित्वाविना काश्मीरियत कशी टिकेल? हा प्रश्न काश्मिरी मुस्लिमांतील सुजाण नागरिकांनाही पडलेला आहे.
 काश्मीरियत म्हणजे नेमकं काय आहे? त्याला तडे गेले आहेत म्हणजे काय घडलं आहे - घडत आहे? या दोन जटिल प्रश्नांचा वेध घेण्यापूर्वी, क्षीण झाली असली तरी काश्मीरियत अद्यापही पंडित काश्मिरी मुस्लिमांत आजही धगधगती आहे. त्याची आशेचा दीप मनात पेटवणारी काही उदाहरणे पाहू.
 श्रीनगरचा टागोर हॉल काश्मिरी मुस्लिमांनी त्या संध्याकळी खचाखच भरलेला. ‘मौज कशिर' नावाचा हा गीत - संगीताचा कार्यक्रम होता. पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो १४ ते १६ वयोगटातील, काश्मीर खो-याला अंतरलेल्या, काश्मिरी पंडितांच्या जम्म व दिल्ली येथे निर्वासित म्हणून जगताना जन्मलेल्या मुलांचा तो कार्यक्रम होता. ही मले लाल देड, नुरुद्दिन उर्फ नंद ऋषी, मेहजूर, अब्दुल आझाद, दीनानाथ नदीम व मोतीलाल साकी इत्यादींची काश्मिरी गीतं मनापासून गात होती आणि ऐकणारे काश्मिरी मुस्लीम श्रोते केवळ दादच देत नव्हते तर त्यांच्या डोळ्यांतून आसवं वाहत होती. त्यामागे एक खंत होती शतकानुशतके बांधव असलेल्या व ज्यांच्या सहअस्तित्वाविना कमतरती वाटते त्या काश्मिरी पंडितांना खो-यातून स्थलांतरित व्हावं लागलं होतं. ती रुखरुख व बोचणी त्या संध्याकाळी सांद्र झालेल्या नजरेतून तीव्रतेनं टपकत होती.

'सर्व चिनार व हिरवळ जळालीय
आम्ही आता कुठे एकमेका भेट?
सर्व झ-यांना काटेरी कुंपणाचा विळखा पडलाय
आम्ही आता कुठे एकमेका भेट?”

 मोतीलाल साकीच्या या गीताचे शब्द कानी पडले आणि टागोर हॉलमधील सर्व काश्मिरी मुस्लीम भावविभोर झाले.

४०६ ■ लक्षदीप