पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/404

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पर्वतराशी डोळ्यांत भरतात. हा अद्भुत नजारा पाहताना भान हरपतं.
 शंकराचार्य मंदिरात आम्ही सुमारे तासभर होतो. एक प्रकारची समाधी लागली होती. पण आम्ही त्यातून बाहेर आलो तो गलक्याच्या आवाजानं. पाहिलं ते मंदिराच्या पहा-यावर असलेल्या पोलिसांनी एका तरुणाच्या मुसक्या आवळून त्याला त्यांच्या चौकीत घेऊन जाताना. रस्त्यानं न येता डोंगर चढून, सुरक्षा रक्षकाचा डोळा चुकवून तो अतिरेकी मागील बाजूनं येत होता. ते पोलिसांनी हेरलं व मंदिराच्या आवारात तो प्रवेशताच झडप घालून त्याला पकडले.
 क्षणभर आम्ही सारे गंभीर झालो. अशांत काश्मीरची ती चुणूक होती. १९८९ पासून पाकिस्तानं दहशतवादाचा अवलंब करीत जे छुपे युद्ध पुकारलं होतं व त्यासाठी जहाल इस्लामाचं विष तरुण काश्मिरी युवकांत भिनवून त्यांचा गिनीपिंगसारखा वापर करीत भारताला रक्तबंबाळ करण्याचे धोरण आखलं होतं, त्याची परिणती अवघं काश्मीर खोरं युद्धभूमी व सैनिकी कॅम्प होण्यात झाली होती. तरीही मागील दोन - तीन वर्षांपासून घुसखोरी कमी झाल्यामुळे पर्यटनाला बहर आला होता; पण काश्मीर सफर किती धोकादायक आहे व केव्हाहीं काहीपण होऊ शकतं याचं आम्हांला चांगलं प्रत्यंतर आलं होतं!आज हिंदू व मुस्लिमांची सलगपणे प्रार्थना स्थळे पाहण्यामागे काश्मीरियतचा शोध घेण्याचा माझा प्रयत्न होता. पण या घटनेनं त्याच्यापुढे एक प्रश्नचिन्ह उभं केलं होतं!
 आमचं पुढील स्थलदर्शन होतं हरी पर्वताचं, हा मुघलकालीन डोंगरमाथ्यावर बांधलेला व स्थापत्यशास्त्राचं एक प्रगत सुघड़ रूप दाखवणारा किल्ला आहे. हे सुलतानाचं उन्हाळ्यातलं थंड हवेचे ठिकाण होतं. तेथे शारिका मंदिर आहे. देवी दुर्गामातेचं हे रूप आहे, असे हिंदू भाविक मानतात. त्याच्या खाली मखदुम साहेबाचा दर्गा होता. याचंही दर्शन घेतलं व बाहेर आलो आणि त्या उंच पर्वतावरून श्रीनगर शहराचा माहोल पाहू लागलो. डोंगराभोवती बदामाचे मळे होते. वसंत ऋतूमध्ये झाडं पुष्पभरित होतात तेव्हा कलासक्त बादशहा जहांगीर व त्याची लावण्यवती बेगम नूरजहां किती मधुर गूज त्या सुगंधी वातावरणात करीत असतील, या कल्पनेनंही रोमांचित व्हायला होत होतं?

 आता आमची इनोव्हा गाडी श्रीनगर शहरातून जात होती. आमचा ड्रायव्हर काश्मिरी मुस्लीम होता. देखणा - रुबाबदार, पण अबोल. मी त्याच्या बाजूला बसलो होतो. त्याला बोलतं करायचा प्रयत्न करीत होतो. आमची गाडी लाल चौकातून शहराच्या मध्यभागातून जात असताना डाव्या बाजूच्या एका देखण्या हॉटेलकडे बोट दाखवीत हे एका हुरियत नेत्याचे आहे, असं त्यानं सांगितलं, तेव्हा मी चमकलो. पण ही संधी आहे त्याला बोलतं करण्याची, हे लक्षात घेऊन मी हुरियतच्या संदर्भात बोलू

लक्षदीप ■ ४०३