पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/400

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काढला आहे व सुमारे एक लाख फतव्यांचं संकलन झाल्याची माहिती त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. तरीही काही फतव्यांमधली कट्टरता व तर्कशुद्धतेला दिलेली सोडचिठ्ठी अस्वस्थ करून जाते.
 मला अन्सारींनी विमानतळावर सोडलं व ते ‘खुदा हाफिज' करून निघून गेले.आता मी दारुल उलुमच्या प्रकाशन विभागाने दिलेली दोन पुस्तकं चाळू लागलो.मागील दीडशे वर्षांचा ‘दारुल उलूम देवबंदचा इंग्रजी इतिहासाचा तो ग्रंथ होता. त्याची प्रस्तावना व काही प्रकरणं विमानास उशीर असल्यामुळे विमानतळावरच वाट पाहताना वाचून झाली. विमानातही मी मधली-मधली प्रकरणं वाचून काढली आणि एका धर्मशिक्षणाच्या चळवळीचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक इतिहास उलगडत गेला.
 तरीही एका दिवसाची, छे, काही तासांची भेट देवबंदी चळवळ जाणून घ्यायला पुरेसा नाही. शिवाय आपली इतर धार्मिक व आधुनिक म्हणून वेगळी तयार झालेली अनेक मतं व विचार पक्के झालेले. अशी पूर्वग्रह आधारित नजरेची मोजपट्टी घेऊन ही चळवळ पाहाणं कितपत बरोबर आहे? मुस्लीम मन, धर्मसंस्कार, परंपरा आणि आचार-विचारानं घडलं आहे. त्यांचे काही अस्तित्वाचे, ओळखीचे प्रश्न आहेत आणि अकरा सप्टेंबरनंतर प्रत्येक मुस्लिमाकडे संशयानं पाहिलं जात असताना, मुस्लीम मनाची अवस्था सहृदयतेनं समजून घेणंही महत्त्वाचं आहे. त्या भूमिकेत शिरून पहायला निखळ मानवतावादी व कलावंताचं मन हवं. मग 'दि रिलक्टंट फंडामेंटॉलिस्ट या ताज्या कादंबरीच्या नायकांची व्यथा समजू शकते आणि मन भरून येऊ शकतं.असा सहृदयी हिंदू समाज जेव्हा मुस्लिमांच्या अनुभवास येईल, तेव्हा भारताचा धार्मिक विद्वेषाचा प्रश्न संपलेला असेल.
 आणि असाच प्रयत्न देवबंदसारखा प्रतिष्ठित मदरसा करेल, तेव्हा सोन्याहून पिवळे होईल. हे नजीकच्या नाही, तरी भविष्यात नक्कीच संभवनीय आहे. बाबरी मस्जिद प्रकरण, अकरा सप्टेंबरची घटना व अलीकडचे पाकिस्तानमधील लाल मस्जिद प्रकरण यामुळे मुस्लीम वेगळा विचार करू लागले आहेत. त्यांच्यात सूक्ष्म पण दृढ बदल होत आहेत. त्याचा वेग आजमितीस बराच कमी आहे. पण तो जेव्हा वाढेल, तेव्हा तो एका सामाजिक चळवळीचं रूप घेईल हे निश्चित. त्यासाठी देवबंद चळवळ पुढाकार घेईल का? हा खरा लाखमोलाचा सवाल आहे.
 मी मनानं व विचारानं शिणलो होतो. विमानात थंड गारव्यानं पापण्या जडावत होत्या. मी पुस्तक मिटलं. किंग फिशरच्या विमानात टी.व्ही. व म्युझिक चॅनल असतं, त्यातलं एक जुन्या हिंदी गाण्याचं आहे. ते मला आवडतं. ते मी सुरू केलं आणि गाणी ऐकत डोळे मिटले.
 आणि माझा आवडता शायर साहिर लुधियानवीची कव्वाली सुरू झाली,

‘ये इश्क इश्क है, इश्क, इश्क'

लक्षदीप ■ ३९९