पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/399

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दहशतवादी कृत्ये करतात, तेव्हा त्यांना कसे रोखायचं? या मागची प्रेरणा काय आहे? व तिचा इस्लाम धर्माशी कसा संबंध येतो वा लावला जातो? त्यात कितपत तथ्य आहे? असे अनेक प्रश्न मला पडले होते.
 आज अन्सारींच्या विश्लेषणानं त्यांचं एक वेगळं उत्तर मिळत होतं. त्याबाबत अधिक विचार करून माझं मत व दृष्टिकोन मला बनवला पाहिजे.
 खरं तर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर व शेवटच्या मोगल बादशहा बहादुरशहा जफरला रंगूनला कैद करून पाठवल्यानंतर मुस्लीम समाज सत्ताविहीन झाला होता व त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला होता. त्यातून वाट काढण्यासाठी देवबंदच्या ‘दारुल उलुमचा जन्म झाला आणि मुस्लीम धर्मशास्त्राचं एक सर्वोच्च केंद्र म्हणून सारा देश व आशिया त्याकडे पाहात धर्मप्रेरणा घेऊ लागला व आजही घेत आहे. त्या दृष्टीने ‘दारुल उलूम देवबंदचं ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व निर्विवाद आहे.
 हे ज्ञानकेंद्र म्हणूनही महत्त्वाचं आहे. इथं हजारो धर्मग्रंथ उत्तम कोरीव अक्षरात लिहिलेले आहेत. मला ग्रंथपालांनी औरंगजेबाने स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेल्या सुवर्णाक्षरातील कुराणाच्या प्रती दाखवल्या व ना. सं. इनामदारांनी पूर्ण न्याय दिलेली औरंगजेबावरची ‘शहेनशहा' कादंबरी स्मरली. तसंच प्रभाकर पणशीकरांनी रंगवलेला बहारदार औरंगजेबही डोळ्यांसमोर आला. आता ‘दारुल उलुम' आधुनिक तंत्रज्ञान वापरून पुस्तकं नीट जतन होतील अशी भव्यं लायब्ररी बांधणार आहे. हा पुढाकार है एक उत्तम प्रतीचं ज्ञानकेंद्र आहे हे अधोरेखित करतो.

 तरीही मनात अजून काही प्रश्न होतेच. त्यातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न फतव्यासंबंधीचा होता. इमरानावर तिच्या सास-यांनी बलात्कार केला, म्हणून तिचा नवरा, तिचा मुलगा झाला. त्यामुळे तिनं सास-यांशी निकाह करावा, हा फतवा मनात होताच. तसंच अलीकडे फोटोग्राफीवर बंदी घालणारा फतवाही देवबंदनं काढलेला आहे. ऐंशीच्या दशकातील सिनेमाबंदीचा फतवाही गाजला होता.या संदर्भात माहिती घेतली तेव्हा कळलं - मुस्लिमांना धर्माचे व जगण्याचे प्रश्न पडतात, तेव्हा ते ‘दारुल उलूम'कडे जातात. ते धर्मशास्त्राप्रमाणे निवाडा देतात, त्यांनाच फतवा म्हटलं जातं. इथं कुराणे शरीफचे शब्दप्रामाण्य आणि हादिसच्या परंपरांचा आधार घेतला जातो. पण तर्कप्रामाण्याचं (इज्तेहाद) प्रमाण धर्मसुसंगत असलं, तरी त्यांची परंपरा क्षीण आहे. बदलत्या काळानुसार व आधुनिक ज्ञानविज्ञानाच्या दुनियेत कालसुंसगत निवाडा करण्याचे अधिकार इज्तेहादच्या संकेतानं धर्मगुरूंना प्राप्त झाले आहेत. त्याचा आधार घेऊन देवबंदनं तस्लिमा नसरीनचा शिरच्छेद करण्याच्या फतव्याची निंदा केली आहे, हे उल्लेखनीय आहे. वेळोवेळी मुफ्ती व मौलवी-उलेमांनी काढलेल्या फतव्याचं संकलन लेखनबद्ध करण्यासाठी एक वेगळी स्वतंत्र ‘दारुल इफ्टा' नावाचा विभाग देवबंदला

३९८ ■ लक्षदीप