पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण तिनं त्याच्याकडे पाहात जेव्हा नापसंतीदर्शक खांदे उडवले व नजरेतील तीव्र तिटका-याचं जहर फेकलं,त्याच्या पायातलं बळचं संपून गेलं!लोहचुंबकाप्रमाणे तो तिथंच खुर्चीला मूढ मुग्धाप्रमाणे खिळून राहिला.
 त्याची उपस्थिती जणू लीनाच्या गावी नव्हती असंच ती सफाईनं वावरत होती,टॅपीजचे खेळ करीत होती!
 डोळ्यांत सांभाळलेल्या अश्रृंमुळे तिची उंचावरील आकृती त्याला धूसर वाटत होती. स्वप्नाप्रमाणे तिच्या हालचाली भासत होत्या!
 त्याच्या मनावरचा ओरखडा खपलीप्रमाणे निघाला होता!
 खरं तर त्याच्या जीवनात लीना आली होती ती सोनेरी स्वप्नं घेऊन! स्वत:च्या बुटकेपणामुळे आयुष्यभर तो लोकांच्या अवहेलनेचे व कुचेष्टेचे जहर पीत आल्यामुळे तो स्वत:वर सदैव नाराज असायवचा.
 ही जिव्हारी खुपणारी कुचेष्टा व विटंबना आपल्या नशिबी का म्हणून आहे? माझा काय अपराध आहे? दैवानं कमी उंचीचं वैगुण्य, जे लाखात एकालाच मिळतं ते, माझ्या भागधेयात का द्यावे? लोकही एवढे कसे क्रूर, हिंस्त्र असतात? त्यांच्या कुत्सिततेचा केवढा जीवघेणा दंश आपल्या मन-मानसाला होतो याची जराही जाण नसावी! इतरांचं वैगुण्य व व्यंग हा त्यांच्या लेखी मनोरंजनाचा विषय व्हावा? का? का म्हणून?
 त्याच्या कडवटपणानं त्याला नास्तिक केलं होतं.त्याचा देवाधर्मावरचा विश्वासच उडाला होता. तो कधीही देवळात जात नसे.एरिना सर्कसचा प्रारंभ हा सर्कसच्या वैभवाचं प्रतीक असलेल्या 'राजा' नावाचा हत्तीच्या ‘गणेशपूजनानं' व्हायचा.या वेळी सर्कसमधील व्यंकटस्वामीसह सर्व जण रिंगणात हजर राहायचे अपवाद असायचा तो फक्त छोटूचा!वेंकटस्वामी नेहमी म्हणायचे,“छोटू, अरे आपला धंद्यात रोज मृत्यूशी गाठ असते.आपण आजही सुखरूप आहोत ही देवाची कृपा म्हणायची.श्रद्धेनं फळ मिळतं-!"
 छोटूनं वेंकस्वामींना कधीही उत्तर दिलं नाही.पण तेवढ्याच निग्रहानं तो कधी गणेशपूजनाला हजरही राहिला नाही!
 अशा वेळी लीना त्याच्या जीवनात आली,एक सोनेरी स्वप्न घेऊन! आपणही कुणी आहोत, कुणी तरी आपल्यालाही महत्त्वपूर्ण मानतं ही भावनाच मोठी हृद्य व मनाला उत्तेजित करणारी आहे!
 तो एका धुंदीत वावरत होता.त्याला वाटायचं,लीना ही एक शिल्पकृती आहे.जी आपण मोठ्या प्रेमानं,कलात्मकतेनं घडवत आहोत! मी माझी आहे-

 लहान मुलाला जसं त्याचं खेळणं अतिप्रिय असतं व ते तो कुणाला देऊ इच्छित नाही की, शेअर करू इच्छित नाही तसंच छोटूला तिच्याबद्दल वाटायचं.तिच्याबाबतीत

लक्षदीप । ३९