पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/389

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

द्यायचा? ही जाणीव मनात लख्ख असली की माणसाचं जीवन सहजतेनं बदलत जातं. मग ‘जिंदगी कैसी हे पहेली' वाटत नाही. उलट, इतरांसाठी, आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी, ‘सात रंगे के सपने बुनायचे - विणायचे असतात. हे विणकाम जमतं, त्याच्या अंगात नक्कीच सुखी माणसाचा सदरा असतो. तो तुम्हा आम्हा सर्वांना नक्कीच मिळू शकतो.
 मी सीधा - सरळ, नेक माणूस आहे. कोट्यवधी माणसे अशीच असतात. त्यांचा मी प्रतिनिधी म्हणा ना. थोडासा लेखक, जरा विचार कराणारा आणि ते शब्दात मांडू शकणारा. मी आज माझं जे जीवनगाणं उलगडतोय, ते तुमचं पण आहे, असावं. जगताना आपण फक्त जगत असतो. पण मनात हे सारे विचार असले, ते रक्तात मुरले की जीवनप्रवास सुरेल होऊन जातो. हीच आहे जिंदादिली. म्हणून शेवटी एवढंच म्हणतो,
 जिंदगी जिंदादिली का नाम हैं। मुर्दे क्या खाक जिया करते हैं?

०-०-०
३८८ ■ लक्षदीप