पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/387

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गीतातलं तत्त्वज्ञान की, "जिंदगी का साथ निभाता चला गया."
 मी स्वतः पूर्णपणे ‘टी टोटलर' असलो तरी अस्सल मद्यपी माणसाचं मला अनिवारे आकर्षण आहे. कारण ती निखळ - खरी माणसे असतात. माझ्या लेखी मनस्वी कलावंताचं व्यसन माफ आहे. या मदिराभक्तांना जीवनाचं खरं दर्शन घडतं असतं. ते असं आहे की, मानवी जीवन हे क्षणभंगुर स्वप्न आहे. जीवनाची स्वप्नवत्क्ष णभंगुरता शैलेंद्रनं किती समर्पकपणे दर्शविली आहे. 'जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झुट क्या और भला सच है क्या'. मला स्वत:ला विचार केला की दोन अर्थाने जीवन स्वप्न वाटतं. जीवनाची क्षणभंगुरता म्हणून त्याकडे जसं पाहाता येतं, तसंच हसत खेळत, सुरेल स्वप्नाप्रमाणे पण जीवन जगता येतं. आपण जे करतो, ते समरसून करावं आणि त्याचा आनंद घ्यावा म्हणजे सुखद लोभस स्वप्नाप्रमाणे जीवन छानपैकी व्यतीत होतं!
 प्रत्येकाला स्वत:ची एक कर्मभूमी असते. लढण्यासाठी, जीवनसंघर्षासठी एक रणभूमी असते. ती कदाचित आपल्याला इच्छेप्रमाणे निवडता येतेच असे नाही, पण एकदा का ती मिळाली की तेथे घट्ट पाय रोवून लढायचं असतं. त्याशिवाय सत न गत असते. “जीना यहाँ मरना यहाँ. इसके सिवा जाना कहाँ' या जाणिवेनं काम केले आणि जीवनाची लढाई सर्वस्वानं लढली की म्हणता येते, “कल खेल में हम हो न हो । गर्दिश में तारे रहेंगे जवाँ । भूलेंगे वो, भूलोगे तू. पर हम तुम्हारे रहेंगे सदा.' जीवनाशी अशी मैत्री मी प्रशासनरूपी समरभूमीत उतरल्यावर मनापासून केली आहे. त्यामुळे असेल कदाचित, मी ब-यापैकी यशस्वी आहे.
 माणसाचं जीवन हे कधीच काळे किंवा पांढरं नसतं, ते विविध रंगानं बनलेलं इंद्रधनुष्य असते. त्यातही हिरव्या रंगाप्रमाणे सुजन घडवावं, लाल रंगाप्रमाणे मनःपूत जगावं, निळ्या रंगाप्रमाणे अथांग व्हावं. काळ्या रंगाप्रमाणे वाईटाचा सामना करावा आणि पिवळ्याप्रमाणे सकारात्मक विचार करावा, आणि सप्तरंगातून जसा शेवटी पांढरा रंग साकारतो. तसं जीवन शांत व पवित्र करावं, “थोडे गम हैं, थोड़ी खुशीयाँ. यही हैं, यही हैं रंगरूप, ये जीवन हैं." हेच खरं नाही का? आणि मनाला हेही बजावा की, "ये न सोचो, इसमें अपनी हार है की जीत है। उसे अपनालो, जो भी जीवन की रीत है.” जीवनाची ही हार - जीतीच्या पलीकडची सुख - दुःखाच्या सीमारेषा पुसून टाकणारी रीत उमगली की जीवनाची वाटचाल सुकर होते!

 आणखी एका सत्याचा आपल्याला कधी विसर पडता कामा नये. ते सत्य म्हणजे या जीवनसृष्टीचा मी म्हणजे एक लहानसा ठिपका आहे. एक ठिपका अनंत यात्रेच्या वाटचालीत पुसला जातो व त्याची जागा नवा ठिपका घेतो. मूळच्या ठिपक्याची नामोनिशाणी पण राहात नाही. त्यामुळे छोट्याशा जीवनात माणसानं किती रागलोभ करायचा? किती आपला क्षुद्र इगो कुरवळायचा? किती लोकांना त्रास

लक्षदीप ■ ३८७