पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/383

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पांढ-या रंगाचं सौदर्य, नजाकत व मन भारून टाकणारा देखणेपणा तुम्हाला मी कसा सांगू? 'चांदणी' मधील श्रीदेवीची शुभ्र शिफॉन साडी व तसाच स्लीवलेस ब्लाऊज किंवा पांढरा सलवार सूट पहा. यश चोप्रांनी तिचं अवखळ, बालसुलभ, संगमोत्सुक आणि समर्पणशील सौंदर्य शुभ्र वस्त्रात असं काही कॅमे-याच्या साहाय्यानं खुलवलं आहे की, तो सिनेमा पहाणं हे परम नेत्र सुख आहे. दुसरं उदाहरण 'मदर इंडिया' नर्गिस दत्तचं, तिने सिनेमा सोडल्यानंतर ती फक्त शुभ्र साड्या नेसायची व अत्यंत डिग्निटीनं वावरायची. जणू जिवंत मदर इंडिया.
 आणि 'अशोक चक्रांकिता ध्वजा ही राष्ट्राची देवता.' असं ज्या तिरंग्याचं ग. दि. मां. नी वर्णन केलंय, त्या राष्ट्रध्वजाचा निळ्या अशोक स्तंभाभोवती मधला शुभ्र रंगाचा पट्टा. तो तुम्ही रवींद्रनाथ टागोर किंवा महात्मा गांधीच्या नजरेनं पाहा. त्यात तुम्हाला या महान भारत देशाचं पवित्र शुभ्र धवल दर्शन घडेल. 'जे जे उत्तम उदात्त उन्नत - महन्मधर' आहे ते सारं या तिरंग्याच्या पांढ-या रंगात आहे. तीच भारताची खरी व अक्षय ओळख आहे. त्या तिरंग्याच्या चरणी शुभ्र कोमल पारिजातकाचीच फुलं अर्पण करून माझं रंगायन संपवतो!

०-०-०

लक्षदीप ■ ३८३