पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/382

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उगवलेला ओठाखालचा काळा ब्युटी स्पॉट उर्फ चामखीळ, स्मिता पाटीलचे भावसंपन्न काळे डोळे व सतेज सावळी कांती, प्युअर ब्लॅक डायमंड म्हणता येतील अशा टेनिस सम्राज्ञी व्हीनस भगिनी, सोनेरी केसांची ब्लॉड स्टेफी ग्राफ, हृतिक रोशनची दाढी केल्यावर दिसणारी गालावरची हिरवट त्वचा, माधुरी दीक्षितचा संगमरवरी गौरवर्ण ... साच्या रंगप्रतिमा सौंदर्याच्या - काही मंद,काही झगमगत्या. पण प्रत्येकाचे सौंदर्य वेगळे!
 मानवी पोशाखाचं सौंदर्यही रंगासह नजरेत येतं. निळी गर्द रेशमी पैठणी, हिरवी काचोळी, चांदनी' फेम शुभ्रसतेज सलवार सूट, माधुरीचा 'हम आपके हे कौन' मधला हिरवा घागरा, यश चोप्राच्या सिनेमातल्या रूपसुंदर नायिकांच्या विविधरंगी शिफॉनच्या साड्या, पुरुषांची रफटफ जीन पॅट, राजेंद्र कुमारची काळीगर्द शेरवानी, देवानंदच्या विविधरंगी टोप्या व स्कार्फ, ऋषी कपूरचे मस्त रंगीबेरंगी स्वेटर्स, निळू फुलेंचं स्टार्च केलेलं कडक पांढरं धोतर, ‘तुघलक' मधील देखण्या अरुण सरनाईकच्या उघड्या मर्दानी देहावरील निकर, सचिन तेंडुलकराचा सेंचुरी मारल्यानंतर घामाने भिजलेला निळा टी शर्ट, ओशोंची पायघोळ भगवी कफनी, इंदिरा गांधीच्या गर्भश्रीमंत, केवळ त्यांनाच शोभतील अशा साड्या, रेखाचा ‘उमराव जान' मधील घागरा, भगतसिंग राजगुरूंचा बसंती चोला, पी. चिदंबरम, अँटनीची शुभ्र लुंगी, अशोककुमार - रेहमानचा गर्द निळा गाऊन, प्रियांका चोप्राची ‘दोस्ताना' मधली सुवर्ण रंगाची बिकिनी', 'जंजीर' मधला प्राणचा भडका तांबडा पठाणी ड्रेस... कितीतरी सौंदर्यप्रतिमा आठवतात.काहीचं सौंदर्य मादक, काहीचं भारदस्त घरंदाज, कुणाचं पुरुषी - मर्दानी तर कुणाचं घायाळ करणारं - तेही साजेशा रंगानं शतपटीनं खुलणारं!
 खरंच, रंगांची भुलावण काही अजब आहे.रंग हा मानवी जीवनावर प्रभाव टाकणारा एक घटक आहे. माझी स्वत:ची रंगाबद्दलची खास मतं, निरीक्षणं आहेत, ती येथे नोंदतो.

 माझा सर्वात आवडता रंग आहे निळा. सागराची गहराई व आकाशाची अनंतता दाखवणारा व श्रीकृष्णाची कांती असलेला. तो अथांग शांततेचं मला प्रतीक वाटतो. हिरव्या रंगाच्या सर्व छटा मला लोभस वाटतात. कारण हा सृजनाचं, तारुण्याचं आणि नवनिर्माणाचं प्रतीक आहे. पेरल्यावर जे उगवतं ते हिरव्या रंगाचं रूप घेऊन येतं. काळी जमीन व बोडका डोंगर हिरव्या शालीनं पाऊस पडताच निसर्ग शृंगारतो. पिवळा व सुवर्ण रंग हा उत्साह व उन्माद, आवेग प्रगट करतो. तो जीवनात नसेल तर काय राम? तांबडा रंग हा लालसा व उग्र-मंगलतेचं भीषण सौंदर्य दाखवतो. त्यातली गुलाबी छटा प्रेम प्रकट करणारी म्हणून प्रिय! बालकांचे गोबरे गाल व तरुणींच्या ओठावरचे गुलाबपुष्प सारखेच लाघवी व मोहक आणि पांढरा रंग हा तर अभिजात सौंदर्य. असीम पावित्र्याचा रंग. सारे रंग या रंगात विलीन होणारे म्हणून हा सर्वश्रेष्ठ,

३८२ ■ लक्षदीप