पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/372

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उदाहरण. दुर्दम्य जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तिनेही ही अवघड परीक्षा सर केली. नूल, ता. गडहिंग्लजची स्मिता पाटील घ्या किंवा शाहूवाडीमधील तुरुकवाडीचा श्रीधर पाटील घ्या. ग्रामीण परिसरातील बहुजन वर्गातील या साच्या मुलामुलींनी मोठे स्वप्न पाहिले आणि ते साकारले जिद्द, परिश्रम आणि आशावादाच्या बळावर. २०१० च्या यु.पी.एस.सी.मध्ये हे सारे उत्तीर्ण झाले आहेत.
 या सर्वांवर कळस चढवला आहे तो डॉ. फैजल शहा या कुपवाड़ा (काश्मीर) या दहशतवादाच्या छायेखाली सतत वावरणाच्या जिल्ह्यातील लौलब गावच्या तरुणाने. तो देशभरात प्रथम आला आहे व तोही पहिल्याच प्रयत्नात. अशान्त काश्मीर खो-यात एक आशेचा किरण त्याने हजारो काश्मिरी तरुणांना दाखवला आहे. त्याची कहाणी ही नक्कीच देशभरच्या तरुणांसाठी त्याला 'आयकॉन' बनवणारी आहे. त्याचे वडील साधे शाळामास्तर. ते काही वर्षांपूर्वी दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडले. छोट्या फैजलसाठी हा मोठा आघात होता, पण त्याच्या आईने - मुबेना बेगमने न डगमगता खंबीरपणे संसार सावरला. मुलाबाळांसह ती श्रीनगरला येऊन राहिली. फैजल प्रथम एम.बी.बी.एस. डॉक्टर बनला व या वर्षी भारतात प्रथम क्रमांकाने पास होऊन आय.ए.एस. झाला.
 वाचकहो, हा भारतीय प्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाचा ताजा कलम आहे. बहुजन समाजातील, ज्यांना आपण ओ.बी.सी. म्हणू, त्या संवर्गातील तरुण-तरुणींचे प्रमाण भारतीय लोकसेवेत वाढत आहे, तसेच दलित समाजाचेही. एकेकाळी उच्चवर्णीयांची मिरासदारी असलेल्या भारतीय प्रशासन सेवेचा तोंडवळा सर्वार्थाने बदलत चालला

आहे. अगदी मंत्रालयाचे उदाहरण पाहिले तरी पन्नास-साठच्या दशकात मंत्रालयीन कक्षअधिकारी, अवर सचिव यांसारखी सारी पदे कोकणातील उच्चवर्गीयांची असायची. आज मंत्रालयात ख-या अर्थाने महाराष्ट्र त्याच्या पूर्ण जातीय-वर्णीय समीकरणासह दृश्य स्वरूपात दिसून येतो. कोल्हापूर जिल्ह्यातले सहा डेस्क ऑफिसर - कक्षअधिकारी - ‘यशदा'च्या प्रशिक्षणानंतर क्षेत्रीय अनुभवासाठी सध्या दीड महिना कोल्हापुरात आले आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत हेच जाणवले की भारतीय प्रशासन, मग ते तहसीलदार - गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक - उपअधीक्षकांचे वा मंत्रालयीन संवर्गाचे असो, अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विभागांचे असो, फार मोठ्या प्रमाणात बदलले आहे. त्याचा तोंडवळा व अंतरंग दोन्हीही आता ख-या अर्थाने भारतीय - ग्रामीण, ओ.बी.सी., दलित आणि निमशहरी - शहरी असं बहजिनसी झाले आहे. तेल्हारा, जिल्हा अकोला मधील एका छोट्या गावचा, बालपणी रोजगार हमीचे काम केलेला दलित समाजाचा एक तरुण जे.पी.डांगे - हे आज महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत; त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित व बहुजन समाजाने - वर्णव्यवस्थेने व शैक्षणिक संधीच्या असमानतेने, शिक्षण व प्रतिष्ठा नाकारलेल्या गेलेल्या समाजानं

३७२ ■ लक्षदीप