पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण प्रमाण तुलनेने कमी होते. इतकेच.
 या राजकीय अस्थिरतेचा भारतीय प्रशसनावरही परिणाम झाला. अनेक प्रांतात एका नेत्याभोवती केंद्रित राजकीय पक्षाची सत्ता आल्यामुळे व केंद्रातील आघाडी सरकारांमुळे प्रशासकांची निष्पक्षता हळूहळू कमी होत गेली तसेच "Competitive populite politics" चा उदय व प्रसारही याच काळात झपाट्याने होत केला. त्यासाठी ब्यूरॉक्रसीचा बिनदिक्कत वापर सुरू झाला. त्या वेळी ठामपणे व नेटाने विरोध केला नाही त्यामुळे ही घसरण होणे अपरिहार्य होते!
दोन : देशाच्या अखंडतेचा व एकात्मतेचा प्रश्न
 भारतीय घटनेच्या सरनाम्याप्रमाणे देशाचा कारभार चालत असला तरी देशाच्या एकात्मतेला व अखंडतेला असणारी भीती व चिंता वाढत चालली आहे. काश्मीर प्रश्न चिघळण्याला १९८९ पासूनच सुरुवात झाली. आजही काश्मीरचा प्रश्न देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी सर्वांत मोठा चिंतेचा विषय आहे. पंजाबच्या अतिरेक्यांनी खलिस्तानच्या मागणीसाठी केलेल्या दहशती कारवायांमुळे एक दशक भारताला अत्यंत विपरीत परिस्थितीमधून जावे लागले. आजही ईशान्येकडील राज्ये धगधगती आहेत. मुख्य म्हणजे देशाच्या सुमारे एक चतुर्थांशपेक्षा अधिक जिल्ह्यात नक्षलवादाने उग्र रूप धारण केले आहे. देशात हिंसाचार वाढला आहे. अतिरेकी धर्मवादाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. मंडलवादामुळे जातीच्या अस्मिता टोकदार व धारदार झाल्या आहेत. बेरोजगारीमुळे अनेक राज्यात स्थानिक विरुद्ध परके' असा संघर्ष पेटत आहे. त्याद्वारे भाषिक अस्मिताही उफाळून आल्या असून त्याही विकृत रूप धारण करीत आहेत. या सा-यामुळे आज भारत देश सुप्त ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे पण सुदैवाने भारतीय माणसांचा अंगभूत शहाणपणा व मध्यममार्गी प्रवृत्ती यामुळे अशा स्फोटक परिस्थितीतही भारताने लोकशाही टिकवून धरली आहे. सा-या जगाने विस्मयाने पाहावे असा हा लोकशाहीचा अपूर्व प्रयोग चालू आहे. त्यात अनेक दोष असले तरी मतपेटीतून राजकीय क्रांती व शांततापूर्ण सत्तांतर होत आहे. त्यामुळे देशाच्या कारभाराचा केंद्रबिंदू भारतीय माणूस बनला आहे. राजकीय पक्ष कितीही संघर्ष करीत असले तरी दर पाच वर्षांनी मतदारांपुढे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना जावे लागते व मतदारराजा काय करेल ही भीती असल्यामुळे लोकानुनय करणे त्यांना क्रमप्राप्त आहे. हे लोकशाहीसाठी चांगले आहे, पण लोकरंजन केवळ पुरेसे नाही तर लोकहितही तेवढेच महत्त्वाचे आणि त्याहून जादा देशहित महत्त्वाचे ही जाण नेत्यांपेक्षाही आम आदमीला जास्त आहे, असे मागील दहा-पंधरा वर्षांच्या घडामोडी पाहाता कुणाही अभ्यासकाला जाणवेल.

 ही जाण राजकीय नेत्यांप्रमाणे प्रशासकांना - ब्यूरॉक्रसीला तेवढ्या प्रमाणात आहे का, हा लाखमोलाचा सवाल आहे. राजकीय नेत्यांना ती नसेल तर ते निवडणुकीत

लक्षदीप ■ ३५७