पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/356

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आजच्या ब्यूरॉक्रसीच्या हासाचे, तिच्या कमी झालेल्या प्रभावाचे हे एक कारण नक्कीच आहे. आजही ब-याच प्रमाणात घटनेप्रमाणे वागणारे व उत्तम प्रशासन निर्भीडपणे देणारे अनेक ‘अनसंग हीरो' आहेत, पण त्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आहे. प्रवाहाशी जुळवून घेण्यात व्यावहारिक शहाणपण मानणारे बहुसंख्य झाले आहेच. यावर उपाय शोधण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली यांनी Administrative Reform commission च्या अहवालात अनेक मूलगामी उपाययोजना सुचवल्या आहेत, त्यांचा ऊहापोह मी योग्य वेळी करणार आहेच, पण आज तरी त्याबाबत काही निर्णय होत नाही असे चित्र आहे.
 मागील काही अध्यायात आपण चाणक्य काळ, मोगल काळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ यातील भारताची आणि विस्तृत प्रमाणात ब्रिटिश काळातील प्रशासनव्यवस्थाही अभ्यासली. आता मला स्वातंत्र्योत्तर साठ वर्षातील भारतीय प्रशासन व्यवस्थेवर क्ष-किरण टाकून नेमके छायाचित्र वाचकांपुढे उभे करायचे आहे.
 भारतीय नोकरशाहीचे मागील साठ वर्षांतील स्वरूप पाहण्यापूर्वी या साठ वर्षांतील प्रशासनाच्या संदर्भातील प्रमुख प्रभाव टाकणारे प्रवाह पाहणे आवश्यक आहे, ते खालीलप्रमाणे आहेत.
एक : अस्थिर राजकीय परिस्थिती

 पंडित नेहरूंचा पंतप्रधानपदाचा कालखंड हा स्थिर राजकीय, एकपक्षीय (काँग्रेस) राजसत्तेचा व विकासाचा होता. पण १९६५ साली प्रथमच काँग्रेसचे बहुमत अत्यंत कमी झाले व १९६९ साली देशातील नऊ प्रांतांत संयुक्त विधायक दलाचे सरकार आले. राजकीय अस्थिरतेच्या काळाची ती सुरुवात होती. याच काळात सत्तेसाठी पक्षांतर करण्यास सुरुवात झाली. तसेच काँग्रेस पक्षातील अंतर्गत सत्तासंघर्ष या काळात चरमसीमेवर गेला. त्यातून व्ही. व्ही गिरी विरुद्ध संजीव रेड्डी अशी राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली आणि काँग्रेस पक्षात फूट पडली. पण नंतर १९७१ च्या युद्धात देदीप्यमान विजयामुळे वे ‘गरिबी हटाव' सारख्या घोषणा, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे व ‘आम आदमी’ साठीचा वीसकलमी कार्यक्रम यामुळे इंदिरा गांधींनी काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळवून देत राजकीय स्थिरता दिली. पण वाढती महागाई, बेरोजगारी व असंतोष यामुळे सामाजिक अस्थिरता माजली, (ती आजतागायत कायम आहे) पुढे राजीव गांधींना बहुमत होते, तरीही ती कायम होती. कारण अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांची सत्ता आली होती व भारतीय जनता पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता. व्ही. पी. सिंग ते मनमोहनसिंग (व्हाया अटलबिहारी वाजपेयी) यांचे पंतप्रधानपदाचे कालखंड हे राजकीय अस्थिरतेचे व आघाडी सरकारचे होते व आहेत. म्हणजे एकपक्षीय सत्तेची राजकीय स्थिरता भारतात १९८९ पासून नाही. त्यापूर्वीच्या १९६९ पासूनचा कालखंडही अस्थिरतेचाच होता,

३५६ ■ लक्षदीप