पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/345

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मी इथल्या कॉलेजच्या उपप्राचार्याशी बोललो आहे व काही दिवसांतच काही कॉलेज युवकयुवतींसाठी प्रबोधन शिबीर आयोजित करणार आहोत. त्यात निकोप मैत्री, स्त्री-पुरुष समानता आणि निरोगी नैसर्गिक लैंगिकता याबाबत व्याख्याने, चर्चा व दृकश्राव्य माध्यमाच्या आधारे नवा विचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 “दुसरी बाब असहकार, निषेध व पिकेटींगची. भाऊसाहेब, मी तुम्हाला गांधीमार्ग सांगावा एवढा मी मोठा खचितच नाही. असे प्रकार घडण्यामागे, खास करून सत्ता व संपत्ती असणा-या वडिलांचे स्वत:चे सैल वर्तन आणि मुलांवर कळत नकळत केले जाणारे चुकीचे संस्कार आहेत. प्रस्तुत प्रकरणात काय घडले? माजी अध्यक्ष आपली सामाजिक प्रतिष्ठा व राजकीय प्रभावाचा त्याला वाचवण्यासाठी वापर करत आहेत, पण त्यात ते सफल होणार नाहीत हे नक्की. पण आजही ते समाजात जवळ माथ्याने कसे वावरू शकतात? आणि मुख्य म्हणजे लोकही त्यांना उद्घाटन, सत्कार सोहळ्याला का निमंत्रण देऊन बोलावतात? लोक त्यांच्या हस्ते पारितोषिक व हारतुरे कसे घेतात? त्यात त्यांना संकोच, लज्जा का वाटत नाही? अशा बेजबाबदार समाजद्रोही माणसावर आपण सामाजिक बहिष्कार का नाही घालत? का नाही तुम्ही आज त्यांच्या घरावर मोर्चा नेत? भाऊसाहेब, हे सामाजिक बहिष्काराचं जालीम अस्त्र वापरायचं असेल तर तुमच्यासारख्या विवेकी व साधनशुचिता मानणाच्या गांधीवादी नेत्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक प्रबोधन आणि बहिष्कार या दुहेरी मार्गाने कार्यकर्ते, प्रशासन आणि लोकनेते यांनी मिळून काम केलं, तरच अत्याचाराला बळी पडणाऱ्या मायभगिनींना न्याय देऊ शकू."

 हा प्रसंग इनसायडरला सांगताना चंद्रकांत म्हणाला, “मित्रा, प्रशासनात या कलेक्टरांसारखे सामाजिक विचार करणारे व त्यासाठी अधिकार वापरणारे प्रशासक वाढले तर स्त्री-अत्याचार निर्मूलन चळवळीत गुणात्मक फरक पडू शकतो, हे नक्की! पण आम्ही हाती एकवटलेले अधिकार व त्याच्या वापरातून उपभोगाच्या जीवनशैलीत रममाण झालेले बहुसंख्य अधिकारी आहेत. जो समाज आपल्या करातून आमचं पगारपाणी करतो, त्या समाजाचं आपण काही देणं लागतो याचा गांभीर्याने विचार आम्ही अधिकारीवर्ग केव्हा करणार? हा सवाल आजच्या घडीचा आहे. त्याचं उत्तर, दुर्दैवाने, आज तरी होकारार्थी देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे."

लक्षदीप ■ ३४५