पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हटले, “अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते? जस्ट इम्पॉसिबल. प्रशासन हे नेहमीच सत्ताधा-याचं बटीक राहिलं आहे. अन्यायाकडे डोळेझाक करीत राहिलं आहे.”
 “तुमचं हे जनरल विधान असेल तर मला काही म्हणायचं नाही.' कलेक्टर तरीही संयम बाळगून होते. पण आवाजाला थोडी धार चढली होती, "पण रोख आमच्याकडे असेल तर एवढंच म्हणेन, तुम्ही माहिती न घेता पूर्वग्रहदूषित नजरेतून पाहात व बोलत आहात. मोर्चा काढला, दोन तास कंठाळी भाषणं दिली, चार लेख पेपरात लिहिले म्हणजे झालं? या बलात्काराच्या रूटकॉजकडे आपण पाहता काय? त्याच्या निर्मूलनासाठी काही स्टॅटेजी, लाँग टर्म प्लॅनिंग व प्रबोधनासाठी काही कार्यक्रम पण आखावा व अंमलात आणावा लागतो. याचा आपण विचार केला आहे?"
 ती कार्यकर्ती अवाक् झाली. अधिकाराचा तोराच मिरवणारे अधिकारी तिने आजवर अनुभले असल्यामुळे कलेक्टरांचं विधान तिला चकित करून गेलं.
 तेव्हा हस्तक्षेप करीत भाऊसाहेब म्हणाले,
 "आम्ही विश्वास ठेवतो की, आपण जातीने लक्ष घालत आहात व आरोपी लवकरच पकडले जातील. पण त्याची ओळख परेड घेणा-या अधिका-यांनाही योग्य त्या सूचना द्या. कोर्टातही प्रकरण नीट उभे राहील, याची काळजी घ्या, अशी समस्त महिला वर्गाच्या वतीने मी विनंती करतो."
 “जरूर, भाऊसाहेब. मी तुम्हाला कलेक्टर म्हणून तसाच एक माणूस म्हणूनही शब्द, नव्हे वचन देतो. गेल्या आठवड्यात हे वासनाकांड घडल्यापासून मी विचार करतो आहेच. तरुण मुलामुलींमध्ये निकोप मैत्री नसणं आणि सेक्सकडे विकृत दृष्टीनं पाहणे हे अशा वाढत्या बलात्कारांचं मूळ कारण आहे. पुन्हा राँग मॅनहूडची कल्पना याच्यामागे आहे. आज आधुनिकतेच्या नावाखाली स्त्री देहाला सिनेमा, टि.व्ही. मधून फॅशनच्या नावाखाली ज्या पद्धतीने प्रदर्शित केलं जातं, त्यामुळे तिला ‘ऑब्जेक्ट ऑफ डिजायर' वा अधिक ब्लंटली सांगायचं झालं, तर उपभोगाची वस्तू म्हणून पेश केलं जातं. तरुण कोवळी मनं त्यामुळे भ्रष्ट होत आहेत. या सामाजिक समस्येची व्यापकता किती आहे याची कल्पनाही करता येणार नाही, एवढं त्याचं भयानक रूप झालं आहे. शिक्षण, नोकरीमुळे स्त्री अधिक मुक्त होत आहे, तिचा सार्वजनिक जीवनात वावर वाढला आहे, पण पुरुषी मनोवृत्तीत फारसा पडक पडला नाहीये. उलट, या आधुनिकतेच्या विकत कल्पनेमुळे आणि वाढत्या चंगळवादामुळे स्त्रीवर अन्याय वाढत आहेत, याचा समाजाने विचार करण्याची वेळ आली आहे."

 “आपले निरीक्षण मार्मिक व अचूक आहे. पण यावर तुम्ही काय उपाय सुचवाल?" भाऊसाहेब कलेक्टरांच्या प्रतिपादनाने चांगलेच प्रभावित झालेले दिसत होते.

३४४ ■ लक्षदीप