पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाणीटंचाईचा आढावा घेणारी मीटिंगसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे."
 “त्यासाठी मी आधी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना वेळेवर जाण्याची विनंती केली आहे, त्याप्रमाणे ते गेले आहेत. आपण शिष्टमंडळाला भेटून निघालात तरी शेवटच्या सेशनला निश्चितच हजर राहू शकता."
 त्याच्या त्यांना कल्पना न देता केलेल्या काहीशा आगाऊ स्वरूपाच्या पण योग्य कृतीनं कलेक्टर निश्चित झाले.
 "ठीक आहे, मी थांबतो आणि भाऊसाहेबांना भेटूनच जातो."
 आजचा महिलांचा मोर्चा नेहमीच्या आम मोर्चाप्रमाणे नव्हता. कारण त्यासाठी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या आल्या होत्या आणि मुख्य म्हणजे ज्या कारणासाठी तो मोर्चा होता, ते कारण सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं, संवेदनाक्षम आणि स्त्रियांवरील निघृण जुलमी अत्याचाराचं होतं.
 काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जळगाव वासनाकांडाची आठवण व्हावी आणि अवघं समाजमन सुन्न आणि संतप्त व्हावं असं हे बलात्काराचं प्रकरणं होतं.
 तीन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या सर्व वृत्तपत्रात पहिल्यापानावर मोठ्या हेडलाईनमध्ये बातम्या आल्या होत्या.
 “जळगाव वासनाकांडाची मराठवाड्यात पुनरावृत्ती!"
 "दोन अश्राप बालिकांवर पाशवी बलात्कार!"
 त्या दिवशी चंद्रकांतला शहरातील महिला पत्रकार प्रेमाताई पाटलांनी फोन करून खबर दिली, “मी पोलीस स्टेशनवरून बोलतेय, सर! काल रात्री रेल्वे स्टेशनच्या गुडस् यार्डमध्ये दोन तरुण मुलींवर बलात्कार झाला. त्यांनी जी फिर्याद दिली आहे, तिच्यावरून बलात्कारी तीन व्यक्तींमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व एका पक्षाच्या विभागीय सचिवांचा मुलगा सामील असावा असा संशय आहे. पोलिसवाले त्यामुळे नीटपणे प्रकरण नोंदवून घेतील व त्या दोघींची वैद्यकीय तपसाणीला वेळेवर म्हणजे चोवीस तासांच्या आत पाठवतील याची प्रशासनानं काळजी घेतली पाहिजे. म्हणून फोन केला. स्त्रीशक्ती केंद्राच्या आम्ही चार-पाच महिला कार्यकर्त्या इथं जातीनं दिवसभर थांबून फॉलो अप करणार आहेत, तरी आपण लक्ष घालावं.”
 चंद्रकांतनं कलेक्टरांना त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन खबर दिली. त्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला व सूचना दिली की, “नीट फिर्याद नोंदवून घ्या. त्यासाठी महिला पोलिस व प्रेमाताई वगैरे महिला कार्यकर्त्यांचे सहकार्य घ्या. मुख्य म्हणजे त्यांना ताबडतोब वैद्यकीय तपासणीला पाठवा."

 “सर, आपण सिव्हिल सर्जनला पण फोन करून सांगा. वैद्यकीय तपासणी काटेकोर व्हावी म्हणून. कोर्टात काही महिन्यांनी जेव्हा बलात्काराचार खटला उभा राहतो, तेव्हा आरोपी सदोष वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे संशयाचा फायदा

३४० ॥ लक्षदीप