पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरावा सापडू शकेल.
 तो कलेक्टरकडे गेला व त्यांना सारं कथन करून म्हणाला,
 "सर, आपण बँकेच्या रिजनल मॅनेजरला बोलावून मला ते व्हाऊचर पाहण्याची परवानगी देण्याची सूचना करा. मला खात्री आहे, माझा अंदाज खोटा ठरणार नाही."
 चंद्रकांत बँकैत पोहोचला तेव्हा तिथं बद्रीप्रसाद व मुनीमजी हजर होते, पण त्यांच्याशी न बोलता तो सरळ मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. त्यांना रिजनल मॅनेजरचा फोन आल्यामुळे त्यांनी व्हाऊचर काढून ठेवले होते. त्यावरून मानेंच्या नावाने दोन टॅकर्सचे पैसे बद्रीप्रसादच्या मुनिमाने भरले होते व तो डी. डी. घेऊन मुनिमानेच रॉकेल कंपनीच्या कार्यालयात जाऊन रॉकेलचे भरलेले टॅकर्स घेतले होते, हे आता कागदोपत्री सिद्ध होत होतं! कारण मानेच्या नावाने डी. डी. साठी व्हाऊचर्स भरताना मुनीमने नेहमीच्या सवयीने बद्रीप्रसाद अँड कंपनी' ची रबर स्टॅप मारून आपली सही केली होती. तिथंच तो फसला होता.
 चंद्रकांतनं रुद्रावतार धारण करताच मुनिमानं कबुली जबाब दिला. चंद्रकांत मग अधिक खोलात गेला व त्यानं एक वर्षाचे सर्व व्हाऊचर्स तपासले. तेव्हा अनेक किरकोळ आणि सब एजंटांच्या नावाने 'बद्रीप्रसाद अँड कंपनी ने पैसे भरण्याचे व ते टॅकर्स उचलल्याचे निष्पन्न झाले. एवढा भरभक्कम पुरावा हाती आल्यावर बद्रीप्रसादचा परवाना रद्द करताना काही अडचण आली नाही.
 शहराच्या केरोसिन किंगचा रॉकेलचा ठोक व किरकोळ परवाना रद्द होणे ही धक्कादायक बातमी होती. त्याचा परिणाम जसा अपेक्षित होता तसाच दिसून आला. रॉकेल टंचाई संपुष्टात आली व प्रत्येक एजंट व विक्रेत्याकडे मुबलक रॉकेल मिळू लागले.
 चंद्रकांतवर नागरिकांनी पत्र लिहून वा भेटून अभिनंदनाचा वर्षाव केला.
 चंद्रकांतचं धाडसत्र अधिक वेगानं चालू राहिले. ते अर्थातच राजकारणी व एजंटाच्या अभद्र युतीस पचनी पाडणं शक्यच नव्हतं.
 बद्रीप्रसादच्या प्रकरणानंतर तीनच महिन्यांनी चंद्रकांतची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि काही काळातच “येरे माझ्या मागल्या परिस्थिती आली.
 चंद्रकांत बदलीच्या जागी रुजू होण्यासाठी जाताना इनसायडरपुढे आपलं मन मोकळे करताना म्हणाला,

 "मित्रा, बदलीचं काही वाटत नाही, पण अवघ्या पाच महिन्यात बदली व्हावी - तीही कठोरपणे कर्तव्यपालन केलं म्हणून? ही तर चांगले काम केलं म्हणून पनिशमेंट झाली. मी यातून काय अर्थ काढावा? आजवर बद्रीप्रसाद- सारख्यांशी समझोता करून सुखेनैव काम करणारे अनेक पुरवठा अधिकारी होऊन गेलेच की! मी हा जो काही अट्टाहास केला तो कशासाठी? ज्या गोरगरिबांची चूल त्याविना पेटत

लक्षदीय ॥ ३३७