पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/335

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मला त्याची तुम्ही मोडस ऑपरंडी - कार्यपद्धती सांगितली तर चौकशीच्या वेळी तुमचा सहानुभूतीने विचार करता येईल."
 मधाचं बोट लावीत चंद्रकांतनं मानेला बोलतं करण्याचा प्रयत्न केला.
 “सर, मी सहीपुरता साक्षर आहे. मला लिखापढी कळत नाही आणि हा बद्रीप्रसाद त्यात उस्ताद आहे. माने म्हणाला, “पण त्याच्यापर्यंत जर कुणी पोहोचू शकत असेल तर ते तुम्हीच. त्याला जरूर पकडा व शिक्षा करा सर!"
 चंद्रकांत दिवसभर विचार करत होता तो बद्रीप्रसादचा! हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा जिल्हा एजंट होता. त्यांच्या मार्केटिंग अधिका-यांशी बोलला, पण तो चंद्रकांतच्या ताकास तूर लावू देत नव्हता. तो बद्रीप्रसाद व इतर एजंटच्या रॅकेटमध्ये सामील असणार.
 माने प्रकरणाचा शहराच्या रॉकेल टंचाईवर काही प्रकाणात का होईना अनुकूल परिणाम झाला होता. सर्व ठोक एजंट सावध झाले होते. त्यांनी ब-याच प्रमाणात रॉकेलचा पुरवठा, काळाबाजार करणे कमी केले होते. शहरातील रॉकेल टंचाई जवळपास संपुष्टात आली होती. आयुक्तांनी त्याचं अभिनंदन केलं होतं पण चंद्रकांत समाधानी नव्हता. कारण ही तात्पुरती जीत होती. अजूनही ‘बड़ी मछली' कायद्याच्या जाळ्यात गवसली नव्हती.
 माने प्रकरणात त्याच्या इतकाच दोषी असलेला बद्रीप्रसाद अजूनही पुराव्याअभावी मोकळा होता. त्याचं रेकॉर्ड स्वच्छ होतं. त्यानं मानेला दोन टॅकर्स दिल्याची कागदोपत्री नोंद होती व ते मिळाल्याबद्दल मानेची स्वाक्षरी होती.
 “होय, ती सही माझी आहे, पण केवळ पाच हजार देऊन त्यांनी माझी सही घेतली व स्वतः त्यानं दोन टॅकर्सचा काळाबाजार करून किमान पन्नास हजाराची चांदी केली असणार."
 मानेचं हे वाक्य त्याला बोचत होतं आणि ब्रदीप्रसादला पकडून धडा शिकवल्याखेरीज ख-या अर्थानं या मोठ्या माशाला वेसण बसणार नव्हती की शहर व जिल्ह्यातील रॉकेल टंचाई संपणार नव्हती. पण बद्रीप्रसादविरुद्ध काही पुरावा सापडत नव्हता.
 रात्री साडेदहाची वेळ. पुन्हा फोनची घंटी. तोच अज्ञात वृद्धाचा थरथरता स्वर.
 "अभिनंदन सर, मी आजच गावाहून परत आलो व जुने पेपर्स वाचले, पण बद्रीप्रसाद खरा गुन्हेगार आहे, तो अजूनही मोकळाच आहे.”
 "होय, पण त्याच्याविरुद्ध काही पुरावा सापडत नाही. तुम्ही काही टीप्स देऊ शकाल का त्याच्या मोडस् ऑपरेंडीबाबत?"
 “टीप नाही, पण एक प्रयत्न करून पाहावा असं वाटतं. तुम्ही त्याच्या बँकेचे रेकॉर्ड का तपासत नाही?"

 पण त्यानं काय होणार आहे, हा प्रश्न होता. दुस-या दिवशी कार्यालयीन

लक्षदीप ३३५