पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असेल व आपल्याला भक्कम पुरावा सापडला तर रॉकेल रॅकेटमधील 'बड़ी मछली पकडता येईल. पहिले बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर स्वारी का करायची हे पटवून देताना जे सूत्र सांगितले ते तर सर्वकालीन सत्य आहे. “मुळावर घाव घातला की फांद्या आपोआपच खाली पडतात. बाजीरावांचे हे प्रसिद्ध वाक्य रॉकेल टंचाई प्रकरणातही लागू पडणार होतं. काळा बाजार करणारा शहराचा 'केरोसिन किंग' जर पकडला गेला तर कृत्रिम टंचाईवर परिणामकारक मात करता येणार होती. शहरातील केरोसिन किंग बद्रीप्रसादनं प्रत्यक्षात वडगाव भागासाठी सब एजंट मानेंना रॉकेलचे टॅकर न देता ते बाहेरगावी काळ्याबाजारात वळते केले होते, अशी बातमी त्या अनाम वृद्धानं देत पुढे म्हणलं, “सर - आपण उद्याच मानेच्या ऑफिसवर धाड टाकली व गावात चौकशी केली तर कळेल की, मागील आठ दिवसात जेमतेम शे-पाचशे लिटर रॉकेल जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी वाटप केलं असेल. एवढेच!"
 चंद्रकांतनं आपल्या पुरवठा निरीक्षकासह दुस-या दिवशी सकाळीच वडगावला जाऊन मानेच्या ऑफिसातील सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. पंधरा दिवसापूर्वी दोन टॅकर्सनं चोवीस हजार लिटर रॉकेल बद्रीप्रसादकडून त्याला प्राप्त झाल्याची व ती पुढील तीन दिवसात वडगाव सर्कलमधील चौतीस स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांना वाटप केल्याच्या नोंदी होत्या. रेकॉर्ड एकदम आलबेल होतं, पण जेव्हा त्या ३४ दुकानदार व एजंटपैकी आठ - दहा जणांच्या गावी जाऊन तपासणी केली तेव्हा गावक-यांनी गावात रॉकेल आलेच नाही असा जबाव लिहून दिला. तेव्हा किरकोळ विक्रेते व स्वस्त धान्य दुकानदारांनी कबूल केलं की, त्यांनी रॉकेल गावी आणलेच नाही आणि आपणावर प्रकरण शेकू नये म्हणून त्यांनी आपण रॉकेल विकत घेतलेच नाही असा जबाब दिला.
 तूर्त चंद्रकांतनं त्यांचा खुलासा मान्य करून यापुढे असे प्रकार करणार नसल्याची हमी घेऊन व त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड करून सोडून दिले. कारण त्याच लक्ष होतं माने व बद्रीप्रसाद.
 पूर्ण चौकशीअंती चंद्रकांतनं हे सिद्ध केलं की, मानेनं बद्रीप्रसादकडून विकत घेतलेलं रॉकेल वाटप न करता काळ्या बाजारात वळतं केलं. कलेक्टरांच्या आदेशान मानेंचा रॉकेल परवाना निलंबित करण्यात आला. निलंबनाचे आदेश घेताना मान चंद्रकांतला स्पष्ट कबुली देत म्हणाला,

 "र आजवर मला कोणी हात लावायची हिंमत केली नव्हती. पण एक यो जितका मी दोषी आहे. त्याच्या दसपट बद्रीप्रसाद दोषी आहे. पण तुम्हाला त्याच्याविरुद्ध पुरावा सापडणं शक्य नाही. कारण पाहुण्याहाती साप मारावा तसा माझ्या नावेच नव्हे, तर ब-याच सब एजंटच्या नावे तोच काळाबाजार करतो, अडकतो मात्र आम्ही."

३३४ लक्षदीप