पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलेल्या काही कामांचे कथन अत्यंत संक्षिप्त स्वरूपात व किंचितही अतिशयोक्ती न करता केले आहे. मी सामाजिक बांधिलकी मानतो. मला जे शिक्षण, पद व अधिकार मिळाले आहेत त्याचा वापर करून जे शक्य आहे ते करावे, असा माझा स्वभावधर्म आहे. मी फार काही केले आहे असे नाही. केवळ माझ्या स्वधर्माचे पालन केले आहे. ते करताना माणुसकी आणि प्रामाणिकतेचे मूल्य शंभर टक्के पाळले आहे. पण मला त्याचे पुरेपूर मापही मिळाले आहे. मी लोकांसाठी जेव्हा कणभर केले तेव्हा लोकांनी मणभर प्रेम दिले. यापेक्षा अधिक काय हवं? मी जनतेच्या मिळालेल्या प्रेमामुळे धन्य तर आहेच, पण नम्र अधिक आहे. मी आत्मचरित्र लिहीन की नाही हे माहीत नाही. पण संधी मिळाली तर ‘परभणी व कोल्हापूरचे दिवस' असं अनुभव-कथनपर जरूर लिहीन. कारण तिथं इतकं काही करता आलं व इतकी माणसं व संस्थांशी मी जोडला गेलो की, तो इतिहास हा एका छोट्या काळाचा व एका शहराचा दस्तऐवज ठरेल. पाहू या, काय होतं ते!

३२४ । लक्षदीप