पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्धारित गावी न जाता, अन्य ठिकाणी गेल्याचे संगणकावर कळायचे व एस. एम. एस. अलर्ट रूट डिव्हिएशन' यायचा. मग मोबाइलचा वापर करून विशेष सॉफ्टवेअर ऑपरेट केले, की टॅकर जाम होईल. तो पुन सुरू करण्यासाठी आमचं सॉफ्टवेअर वापरावं लागतं. ही अक्षरश: क्रांतिकारी कल्पना होती. ती मी मॅग्नम ओपस या आयटी कंपनीच्या गिरीश लाड यांच्या मदतीने विकसित केली. यामुळे केरोसीनचा काळाबाजारही कोल्हापुरात जवळपास थांबला आहे. ह्या उपक्रमामागे महात्मा गांधींच्या विचारांची प्रेरणा होती. शेवटच्या गरीब माणसाचे अश्रू पुसणे हे शासनाचे काम आहे. माझ्या या दोन उपक्रमामुळे मी गरीबांची भूक मिटवू शकलो असं वाटतं. आज महाराष्ट्र शासनाने हे दोन्ही उपक्रम राज्यस्तरावर लागू केले आहेत. माझं आणखी एक सामाजिक उत्तरदायित्वाचे मिशन सफल झाले, असे मी समाधानाने म्हणू शकतो.
 ‘बाल संकुल' ही कोल्हापूरची एक दिवसांपासून अठरा वर्षांपर्यंतच्या अनाथ मुलांचा सांभाळ करीत शिक्षण देणारी संस्था, कलेक्टर तिचे पदसिद्ध अध्यक्ष. साठ वर्षांपासून कोल्हापुरात सेवेचा एक आदर्श प्रस्थापित करणारी संस्था, संस्थेला तिची इमारत कमी पडत होती. दोन नव्या इमारती, ज्यांची किंमत सुमारे सव्वा दोन कोटी होती, बांधणे आवश्यक होते. त्यासाठी शासनाची कोणतीही अर्थसाहाय्याची योजना नव्हती. त्यामुळे मी दैनिक ‘पुढारी'च्या मदतीने निधी संकलनाची मोहीम राबवली. लोकांनी बाल संकुलाचे काम व माझी प्रामाणिक तळमळ, ध्यास व प्रतिमा पाहून भरघोस मदत केली व सुमारे पावणेदोन कोटी निधी-रोख व वस्तुरूपाने जमा झाला. एक इमारत पूर्ण झाली असून दुसरीचे काम चालू आहे व डिसेंबरअखेर तेही काम पूर्ण होईल. एवढे मोठे काम नागरिकांच्या दातृत्वावर विश्वास ठेवून सुरू केले व पार पडले. हा माझ्यासाठी एक फार मोठा मोलाचा अनुभव होता. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या अधिक उन्नत झालो, माझं सामाजिक भान अधिक दृढ झालं. मुख्य म्हणजे लोकांचा विश्वास मी कमावला. त्यांनी त्यामुळे मला प्रतिसाद दिला, त्यासाठी मी स्वतः दिलेली एकावन्न हजारांची देणगी आणि एका अनाथ मुलीचं कन्यादान करीत, कलेक्टरच्या बंगल्यावर पोलीस बँडसह तिचं विधिवत् लग्न लावलं. या दोन बाबींमुळे या कामी नागरिकांचे मला सहकार्य लाभले.
 ‘ई-गव्हर्नन्स' व 'बाल संकुल' या दोन कामांमुळे गरिबांना त्यांचे हक्काचे धान्य व केरोसीन आणि अनाथ मुलांना हक्कांचे ऊबदार घर देऊ शकलो आणि गर्भातच मारल्या जाणा-या मुलींना, हे सुंदर जग पाहण्याची संधी मोठ्या संख्येनं मी, 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमामुळे देऊ शकलो. शासकीय अधिका-यांनी सामाजिक भान ठेवावं आणि जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा असते. मी ती पुरी करण्यात नक्कीच काही प्रमाणात यशस्वी झालो, असं मला वाटतं!

 माझ्या आयुष्यातील परभणी व कोल्हापूरच्या सात वर्षांच्या कालखंडाचे व मी

लक्षदीप ३२३