पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कायदा पालनासाठी असून, डॉक्टरांनी लिंगनिदान करून स्त्रीभ्रूण हत्या करू नये व केली तर ते पकडले जाऊन त्यांना त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आहे.
 डॉक्टरांना समजावणे, त्यांचे मन वळवणे व त्यांना मोटिवेट करून सायलेंट ऑब्झर्व्हर बसवून घेण्यासाठी राजी करणे यासाठी मला माझा अधिकार, संवाद कौशल्य, नैतिक प्रभाव व नित्य पाठपुरावा करावा लागला, तो मी केला व त्याचे मला यशस्वी फळही मिळाले.
 प्रत्येक माणसाला वाटत असतं की, आपण जीवनात येऊन काहीतरी समाजोपयोगी काम करावं. शासकीय सेवेत काम करताना अशी संधी क्वचित मिळते. मी धाडसानं, परिणामांची पर्वा न करता हे काम केलं. नव्हे, माझ्या हातून नियतीनं करून घेतलं, याचं समाधान आहे. दुसरं काम मी पुरवठा विभागात केलं. रेशन दुकानाचं धान्य गरिबांना मिळत नाही, ही तक्रार देशभर आहे. एक आकडेवारी असं सांगते, की, देशभर सुमारे साठ टक्के धान्याचा व केरोसिनचा काळा बाजार होतो. हे कलेक्टर म्हणून माझ्यापुढे आव्हान होतं. मी पुन्हा माझ्या प्रशासकीय प्रतिभेचा वापर करून इगव्हर्नसच्या माध्यमातून उत्तर शोधलं. ते म्हणजे रेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ‘एम - सप्लाय' तर केरोसिनसाठी ‘व्ही. टी. एस. एस.'
 ‘एम - सप्लाय' ही फार साधी पण अभिनव कल्पना आहे. आज देशात ७० टक्के नागरिकांकडे मोबाइल आहेत. मी काय केलं? प्रत्येक रेशन दुकानाचे जे ग्राहक - रेशनकार्ड होल्डर - होते. त्यातील ५० ग्राहकांचे मोबाइल क्रमांक जमा केले व माझ्या ‘एस.एस. एस. ब्लास्टर' यंत्रणेला जोडले. जेव्हा दुकानदार धान्य सरकारी गोदामातून घेऊन जातो, त्याची तपशीलवार माहिती गावक-यांना वा ग्राहकांना तत्काळ उघडकीस येते. पन्नासपैकी कोणीतरी माहिती देतो व दुकानदारास रंगेहाथ पकडले जाऊन शिक्षा होते. ही योजना कमालीची यशस्वी ठरली असून मागील दोन वर्षात जवळपास ९८ टक्के गावात १०० टक्के धान्य पोहोचले व गरिबांना स्वस्त दराने मिळाले. त्या गरीब नागरिकांचा भरल्यापोटी मला दररोज दुवा मिळतो अशी माझी श्रद्धा आहे व त्याचं मला अपार समाधान आहे.

 केरोसिन हे गरिबांचं इंधन आहे, पण त्याचा किती मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो ते सांगायला नको. कोल्हापूरही त्याला अपवाद नव्हतं. २००९ मध्ये मी गावोगावी केरोसिन पुरवठा करणाच्या सर्व खाजगी टॅकर्सवर ‘व्हेइकल ट्रेकिंग सिस्टिम' बसवली. त्यामुळे आम्हाला कार्यालयात बसून टॅकर केव्हा, कोणत्या गावास गेला हे संगणकावर कळायचं. त्यामुळे 'काळा बाजार'ची थोडी जरी शंका आली की, लगेच संबंधित तालुक्याच्या तहसीलदार किंवा पोलीस अधिका-यांस फोन करून तो टॅकर जप्त करायचा आम्ही हुकूम सोडायचो. यामुळे धाक निर्माण झाला. मग त्याच्यापुढे एक पाऊल जाऊन नवे सॉफ्टवेअर बनवले. तेव्हा केरोसिनचा टॅकर उरलेल्या रस्त्याने

३२२ । लक्षदीप