पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संमेलने यशस्वीरीत्या झाली, तेही त्यांचेच संमेलन सर्वोत्तम झाल्याचे सांगतात. पण तटस्थपणे विचार केला तर शंकर सारडांनी आयोजित केलेले साताव्याचे संमेलन, यशवंतराव गडाख व अरुण शेवतेच्या द्रष्टेपणातून भरलेले नगरचे संमेलन व आमचे परभणीचे संमेलन हीच ख-या अर्थाने वेगळ्या वाटा चोखाळणारी होती,असे म्हणता येईल.
 संमेलन परभणीला मिळाल्यापासून ते संपन्न होईपर्यंतचे सहा -सात महिने हा माझ्या जीवनातला मंतरलेला कालखंड होता. मला समर्थ साथ दिली देवीदास कुलकर्णी या माझ्या समवयस्क मित्राने.तर स्वागताध्यक्ष म्हणून कै. रावसाहेब जामकरांचा पाठिंबा आणि वसंतराव पाटील व प्रभाकर पाठकांची मदत व मी-अशा पाच खांबी डोलान्यावर संमेलने पेलले गेले. देवीदास कुलकर्णी व प्रभाकर पाठकांचं या निमित्ताने जुळलेले मैत्र, माझ्या जीवनातला अमोल ठेवा आहे. माणूस इतका निर्मळ, अजातशत्रू, प्रेमळ व निरागस असू शकतो, हे त्यांच्याकडे पाहिलं की पटतं. आजही माझ्या मनी त्यांचे प्रेमाचे स्थान अढळ आहे. किंबहुना, आमची त्रिमूर्ती परभणीत मशहूर झाली होती.

 उद्घाटक म्हणून हिंदी कवी व समीक्षक अशोक वाजपेयी यांना बोलावण्याची आणि आंतरभारती (बहभाषिक) परिसंसवाद व कविसंमेलन करण्याची कल्पना मला सुचली आणि ती मूर्तरूपात आणण्यासाठी प्रसिद्ध कवी व समीक्षक प्रा.चंद्रकांत पाटील यांची मोलाची मदत झाली.ते नेमाडे-चित्रे पंथीय म्हणून प्रसिद्ध व साहित्य संमेलनापासून फटकून राहणारे.बाबा भांडसारख्या त्यांच्या मित्रांनी मला त्याबाबत सावध केलं होतं.पण पहिल्या भेटीतच आमचे सूर जुळले असं म्हणायला हरकत नाही. अशोक वाजपेयींना निमंत्रण देण्यासाठी दिल्ली प्रवास व जाता-येता झालेल्या आमच्या साहित्यिक गप्पा आजही माझ्या स्मरणात आहेत.त्यावेळी मी ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' या अफगाणिस्थानच्या पाश्र्वभूमीवरील आंतरराष्ट्रीय दहशतवाद व राजकारणाचा पर्दाफाश करणारी कादंबरी लिहीत होतो.पाटील हे अत्यंत चोखंदळ व अभ्यासू समीक्षक आणि भारतीय साहित्याचे मर्मग्राही विश्लेषक.त्यांना मी ‘फ्री हँड' दिला होता, मात्र आम्ही चर्चा करूनच परिसंवाद व कविसंमेलनाची आखणी केली.आज माझा त्यांच्याशी फारसा संपर्क राहिला नाही.पण त्या काळातला स्नेहबंध ही माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ-दिंडीने होते.आम्ही त्याला शोभायात्रेचे स्वरूप दिले.उघड्या पोलीस जीपमधून संमेलनाध्यक्ष नारायण सुर्वे व उद्घाटक अशोक वाजपेयींना पूर्ण शहरभर ग्रंथदिंडीसह लोकांचे सत्कार व हारतुरे घेत फिरवलं. प्रत्येक दुकानावर साहित्य गुढी उभारली होती. दोघांच्या गळ्यात किमान हजारभर हार पडले असतील. मोठमोठे साहित्यिक जीपसमोर नाचत होते, फुगड्या घालत होते. प्रत्येक चौकात पोवाडे, गाणी म्हटली जात होती. अशोक वाजपेयी तर

३१८ । लक्षदीप