पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऑटोरिक्षा घेऊन दिली व त्यातून मी शहरभर फेरफटकाही मारला. आज हे तीन प्रसंग जेव्हा मी आठवतो तेव्हा वाटतं की, शासकीय काम करताना मी माणुसकी, प्रेम व जिव्हाळा पेरून माणसं जोडली. अशी शेकडो माणसं मला परभणीत भेटली, म्हणून माझ्या मनात परभणीचं विशेष स्थान आहे. आजही परभणीला जायचं कोणतंही निमित्त मी सोडत नाही. डिसेंबर २०११ मध्ये मला रावसाहेब जामकर स्मृति पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त गेलो होतो. तेव्हा जे पाच शिक्षक संपूर्ण साक्षरता अभियानात पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून माझ्यासोबत अहोरात्र धडपडले, त्यांनी एकत्र येऊन माझा शाल, श्रीफळ व पाच पुस्तके (प्रत्येकाने एक याप्रमाणे पाच) देऊन सत्कार केला. आणि आमच्या अभियानाच्या गप्पा रंगल्या... तो कालखंड तासाभरात पुन्हा जगून झाला आणि मन भरून आलं व कृतार्थही वाटलं!
 वर्षभर झोकून देऊन केलेल्या प्रौढ साक्षरता अभियानाच्या कामामुळे माझ्या कार्यक्षमतेचा आणि व्यवस्थापन कौशल्याचा जसा कस लागला, तसंच एक राष्ट्रउभारणीचं उदात्त काम प्रौढांना साक्षर करण्यामुळे केल्याचं मनस्वी समाधान लाभलं. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन जेलमध्ये जाणं हे देशभक्तीचं लक्षण मानलं जायचं. पण आता स्वातंत्र्योत्तर काळात विकासकामं करणं, विविध लोककल्याणाची अभियानं योग्य पद्धतीनं राबवून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देणं, हे देशभक्तीचं व राष्ट्रउभारणीचं (Nation Building) काम आहे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. देशभर मूल्यघसरण व रसातळाला गेलेली कार्यसंस्कृती यामुळे शासकीय कामे नीटपणे होत नाहीत, हे खरं आहे. पण ती नीटपणे राबवणारे कितीतरी प्रशासक आहेत, त्याचं काम हे देशभक्तीचंच काम आहे व अशा ‘अनसंग हिरो'मध्ये मला पण जागा आहे, असं आत्मस्तुतीचा दोष पत्करूनही मी स्वाभिमानाने सांगेन. परभणीच्या माझ्या या प्रौढ साक्षरता अभियानाच्या कामानं, थोडेतरी समाज व देशऋण फेडीत मी कृतार्थ झालो आहे. आणि त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक, त्यांना प्रेरित केलं तर, किती उत्तम काम करतात हे जाणवलं. खाजगी शिक्षकांपेक्षाही जिल्हा परिषदेचे शिक्षक अधिक कार्यक्षम व विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी मानणारे आहेत असं मला वाटतं!

 परभणीच्या कालखंडात ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्याचा मी कार्याध्यक्ष होतो. हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी झाले. या संमेलनात प्रथमच अध्यक्षीय भाषणावरचा परिसंवाद आम्ही घेतला. तसेच नावाप्रमाणे त्याला अखिल भारतीय स्वरूप देण्यासाठी समकालीन साहित्य और मेरी भाषा' ही, पाच प्रांतिक भाषेतील कवी व समीक्षक असलेल्या साहित्यिकांची वैशिष्ट्यपूर्ण परिचर्चा व आंतरभारती कविसंमेलन मी स्वत: पुढाकार घेऊन आयोजित केले व हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला. संमेलनास आलेल्या सर्व साहित्यिकांनी त्याला मनापासन दाद दिली. हे साहित्य संमेलन ख-या अर्थाने माइलस्टोन ठरले. नंतरही अनेक ठिकाणी

लक्षदीप ॥ ३१७