पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ब-याच वर्षापूर्वीचा - महापुराच्या वेळचा - एक प्रसंग लक्षात आहे. पालकमंत्री रात्री उशिरापर्यंत कामाचा आढावा घेत होते. शासनाच्या एका जी. आर. चा एक अर्थ लावून नजीकच्या पूरग्रस्त जिल्ह्याच्या जिल्ह्याधिका-यांनी मदत-वाटप केली होती. पण माझ्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या अर्थाशी, (जी. आर. च्या इंटरप्रिटेशनशी) सहमत नव्हते. पालकमंत्री अतिशय समतोल बुद्धीचे, विचारी व व्यापक अर्थाने जाणकार. ते खेळकरपणे म्हणाले, “तुमच्या मताशी मी मंत्री म्हणून सहमत आहहे. पण मी आमदारही आहे. माझा मतदारसंघ जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. तेथील कलेक्टरांनी याच जी. आर. च्या आधारे आपग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे. मलाही तशी मदत तुम्ही केलेली आवडेल." सुमारे अर्धा तास चर्चा झाली. पालकमंत्र्यांना मंत्री म्हणून राज्याचे हित पाहताना, अवाजवी मदत करणं बरोबर नाही हे पटत होतं, पण आमदार म्हणून अशी मदत मिळाली तर मतदारसंघात त्यांची लोकप्रियता वाढणार होती.... वास्तविक ते कलेक्टरांना आदेश देऊ शकले असते, पण त्यांच्या विचारी मनाला ते पटत नव्हतं. राजकीय नेता व नात्याने अशी मदत शेतक-यांना मिळवून देणं, ही त्यांची राजकीय मजबुरी आम्हांला जाणवत होती. पण तरीही अत्यंत सुसंस्कृतपणे कलेक्टरांना ते सुचवीत होते. म्हणजे ते एकाच वेळी डबल रोल अदा करीत होते. मी त्यांच्याकडे बारकाईनं पाहात होतो. त्यांचा चेहरा व त्यांची देहबोली निरखत होतो. एका राजकारण्याचे अंतरंग अवचितपणे उमगत होतं, पण त्याचवेळी त्यांची सुसंस्कृतता आणि धोरणीपणाही जाणवत होता. त्या वेळी माझ्या डोक्यात कामाचे असंख्य विषय होते, पण त्या अवस्थेतहीं एक व्यक्तिचित्र मन:पटलावर साकारत होतं. त्याचा मी माझ्या एका कादंबरीत वापर करणार आहे.
 वरील विवेचनाद्वारे मी माझ्या लेखनधर्माचं' मर्म उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सूत्ररूपाने मला अभिप्रेत असलेला लेखनधर्म तीन गुणसूत्रांमध्ये मांडता येईल. पहिलं सूत्र :- जगत असताना, अनुभव घेत असताना, सजगतेनं कथाबीज टिपणं व माणसं, त्यांच्या लकबी, त्यांचं माणूसपण जाणून घेणं. दुसरं सूत्र : - जात, धर्म, गाव, व्यवसाय, वय इत्यादी सर्वच बाबींचा विचार करून त्यांसाठी संदर्भ हुडकून, ते सर्व अंतरंगात मुरवून घेऊन लिहिणं, तिसरं सूत्र :- लेखनासाठी विविधांगी वाचन व व्यासंग करणं. लेखनधर्माची ही तीन गुणसूत्रं सर्वच साहित्यिकांना कमी अधिक प्रमाणात लागू पडत असतील, असं मला वाटतं.

 शेवटी एकच सांगायचं आहे.... लेखकाच्या लेखनाचे प्रयोजन असतं तरी काय? माझ्या मते जीवनाचं, मानवी जीवनाचं दर्शन घडवणं. तो माणसापुढे आरसा धरतो आणि भाष्यही करतो. समग्र मानवी जीवन पकडणं हे टॉलस्टॉय, प्रेमचंद अशा प्रतिभावंतांनाच जमू शकेल. बाकी सारे जीवनाचे कवडसे पकडून दाखवतात. तेच लेखनाचे प्रयोजन आणि ध्येय असतं. निदान मी तरी तसं मानतो.

लक्षदीप ॥ ३११